लाेकमत न्यूज नेटवर्क
काटाेल : तालुक्यातील माळेगाव, भाेरगड व खंडाळा (खुर्द) ग्रामपंचायतच्या सरपंच व उपसरपंच पदासाठी गुरुवारी (दि. ११) निवडणूक घेण्यात आली. यात माळेगाव ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित गटाने बाजी मारली असून, भाेरगड व खंडाळा (खुर्द) ग्रामपंचायतींवर स्थानिक पॅनलचे सरपंच व उपसरपंच निवडून आले. या दाेन्ही ग्रामपंचायतींवर भाजप समर्थित गटाने दावा केला आहे.
तालुक्यातील एकूण ८३ पैकी या तीन ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपल्याने, तिथे सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली हाेती. त्या अनुषंगाने या तिन्ही गावांमधील गुरुवारी सरपंच व उपसरपंचांची निवड करण्यात आली. माळेगाव येथील सरपंचपद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्याने, येथे राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित गटाचे नऊपैकी पाच सदस्य निवडून आल्याने त्यांचे पारडे आधीच जड हाेते. त्यामुळे येथे राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित गटाच्या जया वानखेडे यांची सरपंच तर दिगांबर लाेखंडे यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली.
खंडाळा (खुर्द) येथील सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी राखीव करण्यात आल्याने, येथे स्थानिक जनशक्ती पॅनलच्या सुरेखा सर्याम यांची सरपंचपदी बिनविराेध निवड करण्यात आली असून, हेमेंद्र चरडे यांनी उपसरपंचपदी बाजी मारली. भाेरगड येथील सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित केले हाेते. त्यामुळे येथे सरपंचपदी परिवर्तन पॅनलच्या उमराव उईके यांची तर उपसरपंचपदी राेशन खरपुरिया यांची निवड करण्यात आली. खंडाळा (खुर्द) व भाेरगड येथे स्थानिक पॅनलने बाजी मारली असली तरी, या दाेन्ही गावांमधील सरपंच व उपसरपंच पदावर भाजप समर्थित गटाने दावा केला आहे.