‘इंद्रधनुष्य’ महोत्सव : वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला आढावानागपूर : राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सव ‘इंद्रधनुष्य’साठी आलेल्या पाहुण्या विद्यार्थ्यांची चोख व्यवस्था ठेवण्यात यावी व त्यांच्या आतिथ्यात कुठलीही कमतरता राहू नये असे निर्देश राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जेष्ठ अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिले. गुरुवारी बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला होता. ‘लोकमत’ने याबाबत प्रकाशित केलेल्या वृत्ताची विद्यापीठाने गंभीर दखल घेतली.गुरुवारी आमदार निवासात लग्न असल्यामुळे खोल्या वऱ्हाड्यांना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना बोचऱ्या थंडीत खोल्या मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली. सायंकाळी उशिरा तर गादी व ब्लँकेट्ससाठी विद्यार्थ्यांची पायपीट सुरू असल्याचे दृश्य पहायला मिळाले. या असुविधेबाबत अनेक विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली होती.शुक्रवारी मात्र विद्यापीठाने विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण होणार नाही याची खबरदारी घेतली. शुक्रवारी सकाळी आलेल्या बाहेरील विद्यापीठातील विद्यार्थ्यांची व्यवस्थित सोय करण्यात आली. यावेळी स्वयंसेवकांसोबतच विद्यापीठातील अधिकारीदेखील जातीने उपस्थित होते. (प्रतिनिधी)विद्यार्थ्यांचा योग्य पाहुणचार होईल : कुलगुरू‘इंद्रधनुष्य’च्या निमित्ताने विद्यार्थी येथे आले आहेत. त्यामुळे त्यांचा पाहुणचार करणे हे आमचे कर्तव्य आहे. खास वैदर्भीय पद्धतीने त्यांचा पाहुणचार करण्यात येईल व येथून सर्व विद्यार्थी समाधानाने परत जातील, असा विश्वास कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांना काही अडचणी असतील तर त्या सोडविण्यासाठीदेखील आम्ही केंद्र सुरू केले आहेत. पूर्णवेळ स्वयंसेवक तेथे उपस्थित राहतील अशी माहिती कुलसचिव पुरण मेश्राम यांनी दिली
पाहुण्या विद्यार्थ्यांची सोय करा
By admin | Updated: January 24, 2016 02:39 IST