जितेंद्र ढवळे/ जितेंद्र उके
धामणा (नागपूर) : एशियन फायर वर्क्स या बारूद कंपनीत रविवारी (दि. १६) दुपारी २ वाजताच्या सुमारास स्फाेट झाला. यात दाेन कामगारांचा मृत्यू झाला असून, तिघे गंभीर जखमी झाले. या स्फाेटाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
भुरा लक्ष्मण रजत (२५, रा. बिलमा, जिल्हा शिवनी, मध्य प्रदेश) व मुनीम मडावी (२९, रा. शिवनी, जिल्हा मंडला, मध्य प्रदेश) अशी मृत तर साैरभ लक्ष्मण मुसळे (२५), घनश्याम लाेखंडे (३५) दाेघेही रा. डाेरली (भिंगारे), ता. काटाेल आणि साेहेल ऊर्फ शिफान शेख (२५, रा. राऊळगाव, ता. कळमेश्वर) अशी गंभीर जखमी कामगारांची नावे आहेत.
एशियन फायर वर्क्स नामक कंपनी काेतवालबर्डी, ता. काटाेल शिवारात असून, या कंपनीत एकूण ५० कामगार काम करतात. यात ३३ पुरुष व १७ महिला कामगारांचा समावेश आहे. कंपनीतील एका युनिटमध्ये सात कामगार कार्यरत हाेते. लंच टाइम असल्याने दाेघे जेवण करण्यासाठी घरी गेले हाेते तर एक जणबाहेर गेला हाेता. युनिटजवळ पाच कामगार असताना स्फाेट झाला आणि त्यात दाेघांचा घटनास्थळी मृत्यू झाला असून, तिघे गंभीर जखमी झाले. स्फाेटामुळे परिसरातील जंगलाला आग आली आहे. नागपूर ग्रामीण पाेलिसांसह जिल्हा प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे.