अशोक कोठावळेंचे मत : प्रगट मुलाखत व सत्कारनागपूर : ‘मॅजेस्टिक गप्पा’चे आयोजन कठीण व वेळखाऊ असल्यामुळे हा कार्यक्रम केवळ एखाद्या विशेष प्रसंगीच नागपुरात घेतला जाऊ शकतो, असे मुंबईतील मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसचे प्रमुख अशोक कोठावळे यांनी सांगितले.विदर्भ साहित्य संघातर्फे आज, रविवारी कोठावळे यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी ते एका प्रश्नाला उत्तर देत होते. तत्पूर्वीफ, त्यांचा संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ‘मॅजेस्टिक गप्पा’ हा लोकप्रिय कार्यक्रम मुंबईत गेल्या ३० वर्षांपासून सुरू आहे. आयोजनासाठी लागणाऱ्या परिश्रमामुळे कार्यक्रम बंद करण्याचा विचार मनात येतो. परंतु कार्यक्रम घेतल्यानंतर रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो. यामुळे कार्यक्रम आजही सुरू आहे. त्या काळात बाबांना (मॅजेस्टिकचे संस्थापक केशवराव) भेटायला अनेक लेखक येत होते. त्यांच्या दिलखुलास गप्पा रंगत असे. यातून ‘मॅजेस्टिक गप्पा’चा जन्म झाला, असे कोठावळे म्हणाले.नागपुरात येण्याचा हा माझा पहिला अनुभव नसून, सुमारे २५ वर्षांपूर्वी ‘मॅजेस्टिक गप्पा’च्या निमित्ताने आलो होतो. नागपूरकरांची भव्य स्वरूपात स्वागत करण्याची परंपरा आजही कायम आहे. विदर्भ साहित्य संघाची इमारत अप्रतिम असून मी तिच्या प्रेमात पडलो आहे, अशा भावना कोठावळे यांनी व्यक्त केल्या.केशवराव यांच्या निधनानंतर मॅजेस्टिकचे काय होणार, असा प्रश्न सर्वांना पडला होता. मॅजेस्टिकचा व्याप मोठा होता. परंतु बाबांच्या कार्यपद्धतीची माहिती असल्याने विश्वासाने व्यवसाय सांभाळला. सर्वप्रथम लोकांचा विश्वास संपादित करण्याचे काम करावे लागले. माझ्या नेतृत्वाखाली पहिला दिवाळी अंक उत्तम निघाला होता. शालेय जीवनापासून मॅजेस्टिकमध्ये जात होतो. ‘ललित’ नियतकालिकाच्या वर्गणीदारांचे पत्ते लिहिण्यापासून कामाला सुरुवात झाली. ‘ललित’ व ‘दीपावली’च्या अंकात संपादकीय नसते. त्याऐवजी एखादे सदर लिहिण्याचा विचार मनात नाही. त्यासाठी अनेक चांगले लेखक आहेत, असे कोठावळे यांनी सांगितले. नीलिमा बोरवणकर व वसंत वाहोकार यांनी प्रकट मुलाखत घेतली. याप्रसंगी साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.(प्रतिनिधिी)
‘मॅजेस्टिक गप्पा’ नागपुरात नियमित घेणे अशक्य
By admin | Updated: June 23, 2014 01:17 IST