लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोळशाच्या अपुऱ्या साठ्यामुळे वीज उत्पादन संकटात आले आहे. वीज कंपनी महाजेनको या संकटाचा सामना करीत असतानाच वेस्टर्न कोलफिल्ड्स लि. (वेकोलि)ची तब्बल २५०० कोटी रुपयाची थकबाकीही द्यावयाची आहे. दरम्यान वेकोलिने लोकहितासाठी कुठल्याही परिस्थितीत कोळशाचा पुरवठा रोखला जाणार नाही, असे स्पष्ट केले असले तरी कोळशाचा पुरवठा मात्र पूर्ववत झालेला नाही. त्यामुळे राज्यातील वीज संकट आणखी गडद झाले आहे.
राज्यातील औष्णिक वीज केंद्रात सध्या अर्धा दिवस ते दोन दिवस पुरेल इतका साठा शिल्लक आहे. परिस्थिती अतिसंवेदनशील आहे. चार युनिट बंद पडले आहेत. उत्पादनही कमी केले जात आहे. दुसरीकडे राज्य सरकार व महाजेनकोचे अधिकारी हे संकट दूर करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. संकट कितीही गडद असले तरी राज्यात लोडशेडिंग होऊ देणार नाही, असा दावाही केला जात आहे. महाजेनकोचे अधिकारी वेकोलिच्या संपर्कात सातत्याने आहेत. दुसरीकडे महाजेनकोने मागील अनेक महिन्यांपासून कोळसा खरेदीचे बिल भरलेले नाही. थकबाकी २५०० कोटीवर पोहोचली आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, महावितरणकडून वीज खरेदीचे पैसे मिळत नसल्याने थकबाकी वाढली आहे. तर महावितरण अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की , थकबाकी वसुली सुरू असूनही नागरिकांवर ७५ हजार कोटी रुपयाची थकबाकी आहे. त्यामुळे वीज खरेदीचे पैसे देणे शक्य झाले नाही.
वेकोलिचे अधिकारीही उतरले मैदानात
वीज केंद्रातील कोळसा संकटाच्या पार्श्वभूमीवर वेकोलिचे अधिकारीही आता मैदानात उतरले आहेत. पावसामुळे कोळसा उत्पादन प्रभावित झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वेकोलिचे प्रबंध निदेशक मनोज कुमार यांनी गोंडेगाव, निदेशक (कार्मिक) डॉ. संजय कुमार यांनी नागपूर क्षेत्र व निदेशक (वित्त) आर.पी. शुक्ला यांनी वणी खाणीचे निरीक्षण केले. सुरक्षा व्यवस्था लक्षात घेऊन कोळसा उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान महाजेनको त्यांचा सर्वात मोठा ग्राहक आहे, त्यामुळे थकबाकी कितीही वाढली तरी कोळशाचा पुरवठा थांबवला जाणार नाही, असेही वेकोलिने स्पष्ट केले आहे.