लाेकमत न्यूज नेटवर्क
बुटीबाेरी : दाेघांनी झाेपेत असलेल्या बिअर बार व्यवस्थापक व नाेकराला चाकूचा धाक दाखवून बारच्या गाेदामातील विदेशी दारूच्या ४० पेट्या चाेरून नेल्या. या दारूची एकूण किंमत २ लाख ४२ हजार ५०० रुपये आहेे. ही घटना बुटीबाेरी (ता. नागपूर ग्रामीण) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बुटीबाेरी - वर्धा मार्गावरील सावंगी (आसाेला) शिवारात गुरुवारी (दि. १५) रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणातील दाेन्ही आराेपींना बुटीबाेरी पाेलिसांनी अटक केली आहे.
पप्पू ऊर्फ रफिक लतिफ शेख (३५, रा. एलआयसी काॅलनी, नालवाडी, वर्धा) व साेनू ऊर्फ माेसीन हुसेन खान (३६, रा. फुलफैल, वर्धा) अशी अटक केलेल्या आराेपींची नावे आहेत. मुकेश जयस्वाल यांचा सावंगी (आसाेला) शिवारात बिअर बार असून, संभाजी ऊर्फ राजू माराेती कांबळे (५५, रा. आसाेली-सावंगी, ता. हिंगणा) हे त्या बारमध्ये व्यवस्थापक म्हणून कामाला आहेत. ते गुरुवारी रात्री बारमध्ये झाेपले हाेते.
दरम्यान, रात्री १० वाजताच्या सुमारास लघुशंकेसाठी उठले असता, त्यांना व त्यांच्या नाेकराला (एमएच ४९ एफ १६७०) क्रमांकाच्या कारने आलेल्या पप्पू व साेनू यांनी चाकू दाखवला. या दाेघांनी बारच्या गाेदामातील विदेशी दारूच्या ४० पेट्या कारमध्ये टाकल्या आणि पळून गेले. याप्रकरणी बुटीबाेरी पाेलिसांनी संभाजी कांबळे यांच्या तक्रारीवरून आराेपींविरुद्ध भादंवि कलम ३९२, ३४ अन्वये गुन्हा नाेंदवून तपासाला सुरुवात केली. दोन्ही आरोपींना वर्धा शहरातूून नुकतीच अटक करण्यात आल्याची माहिती तपास अधिकारी तथा पाेलीस उपनिरीक्षक आशिष माेरखेडे यांनी दिली.