नागपूर : पंख आहेत. ते सर्वांज्ञात असते. परंतु केवळ पंख असून चालणार नाही, तर आकाशात झेप घेण्यासाठी आपल्यातील पंख आपण फैलावू शकतो का? याचे उत्तर शोधा. ज्या दिवशी याचे उत्तर सापडेल त्या दिवशी तुम्हाला आकाशात झेप घेण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही, असा दावा युक्रेन युद्धादरम्यान युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी राबविण्यात आलेल्या ऑपरेशन गंगा या अभियानात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या एअर इंडिया लि.च्या एअरलाइन कॅप्टन शिवानी कालरा व ‘गुड टच बॅड टच’ या अभियानाच्या प्रणेत्या व ग्रॅव्हिटॉस फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे यांनी महिलांना केला. वूमन समिटच्या ‘पंख होते तो...’ या चर्चासत्रात आपले विचार व्यक्त करताना त्या बोलत होत्या. यावेळी लोकमत एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा उपस्थित होते.
पंख असते तर मी काय केले असते. हा प्रश्न स्वत:ला वारंवार विचारा, असेही कालरा यांनी सांगितले. तर मी जास्त शिकलेली नाही. परंतु स्वत:वरचा विश्वास आणि मेहनतीने आज ४५ कंपन्यांचा कारभार सांभाळत असल्याचे काकडे यांनी सांगितले.
मॉडरेटरची भूमिका सुरभी शिरपूरकर यांनी बजावली.
रंगकर्मी धनश्री हेबळीकर यांनी पंख होते तो या विषयावर नाट्यछटा सादर केल्या.
- डर के आगे जीत है : कॅप्टन कालरा
भीती प्रत्येकालाच वाटत असते. तशी ती मलाही वाटायची. पहिल्यांदा जेव्हा विमान उडवले तेव्हाही वाटली. परंतु स्वत:मध्ये एक हिम्मत असते. ती हिम्मत स्वत:ला ओळखावी लागते. त्याची ओळख झाली तर बाकी सर्व व्यवस्थित होते, कारण डर के आगे जीत आहे, असा मंत्र कॅप्टन शिवानी कालरा यांनी दिला.
माझ्या लहान भावाच्या लग्नाची तयारी सुरू होती. अशातच ऑपरेशन गंगासाठी फाेन आला, तेव्हा माझे आई-वडील खूप घाबरले होते. कारण टीव्हीवर सातत्याने बातम्या येत होत्या. मलाही भीती वाटली. मात्र प्रत्यक्ष युक्रेनमध्ये युद्धात अडकलेले आपले विद्यार्थी ज्या परिस्थितीचा सामना करीत होते, ते पाहिले तेव्हा मलाही हिम्मत आली. त्या मिशनवर जाणारी मी एकटी नव्हती. माझ्यासोबत इतरही होते. तसेच ते माझे काम आहे. त्यासाठीच आम्हाला वेळोवेळी ट्रेनिंग दिली जाते. त्यामुळे देशाला कधीही आमची गरज भासेल तेव्हा आम्ही तयार आहोत. युनिफॉर्म माझी शान आहे. परंतु त्यापलीकडेही माझी ओळख आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
- पालकांनो मुलींचे मित्र बना - उषा काकडे
लहान मुलींच्या अत्याचाराच्या प्रकरणात बहुतांश ओळखीच्या लोकांचा सहभाग असतो. तेव्हा पालकांनी मुलींचे मित्र बनावे. माझी किंवा मुलीची बदनामी होईल, ही भावना सोडून द्यावी. मुलींशी मित्रत्वाच्या भावनेने वागाल तर त्यांच्या जीवनात दररोज होणाऱ्या गोष्टी त्या तुम्हाला सांगू शकतील, असा सल्ला ‘गुड टच बॅड टच’ या अभियानाच्या प्रणेत्या व ग्रॅव्हिटॉस फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे यांनी दिला.
लहान मुलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी ‘गुड टच बॅड टच’ ही मोहीम आम्ही राबवतो. जवळपास ४ लाख विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचलोय. या दरम्यान विद्यार्थ्यांना तज्ज्ञांच्या माध्यमातून गुड टच बॅड टच कसे असते, हे सांगितले जाते. या दरम्यान त्यांना कायद्याचेही शिक्षण दिले जाते. दरम्यान, लहान मुलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये ओळखीच्याच लोकांचा सहभाग असल्याच्या अनेक तक्रारी आम्हाला मिळाल्या. त्याची तक्रार आम्ही पोलिसातही केली. हे सर्व रोखण्यासाठी पालकांनी मुलांचे मित्र होण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या.