लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : प्रत्येक नागरिकाने आधार क्रमांक त्यांच्या शिधापत्रिकेशी लिंक करणे अनिवार्य आहे. आधार क्रमांक लिंक नसलेल्या शिधापत्रिका रद्द केल्या जाईल. त्यामुळे शिधापत्रिका आधार क्रमांकाशी लिंक कराव्यात, असे आवाहन तालुका पुरवठा निरीक्षक संदीप शिंदे यांनी केले आहे.
कामठी तालुक्यातील सरकारी स्वस्त धान्य दुकानातील ई पॉस उपकरणामधील शपथपत्राद्वारे आधार सीडिंग व मोबाईल सीडिंग सुविधेचा अधिकतम वापर केला जात असून, आधार व मोबाईल क्रमांक सीडिंगचे प्रमाण वाढविण्यात येत आहे. ३१ जानेवारीपूर्वी प्रत्येक शिधापत्रिकेत लाभार्थ्यांचे १०० टक्के आधार क्रमांक व एक वैध मोबाईल क्रमांक सीडिंग करण्याचे आदेश तहसीलदार अरविंद हिंगे यांनी दिले आहेत. त्याअनुषंगाने तालुक्यात विशेष माेहीम राबविली जात आहे, असेही संदीप शिंदे यांनी सांगितले.
जानेवारी २०२१ चे धान्याचे वाटप करतेवेळी ई पॉस उपकरणाद्वारे स्वस्त धान्य दुकानदारामार्फत कुटुंबातील सदस्यांचा आधार सीडिंग नसल्यास अशा सदस्यांनी त्यांच्या नजीकच्या स्वस्त धान्य दुकानात जाऊन आधार व मोबाईल क्रमांकाचे सीडिंग पूर्ण करून घ्यावे. ३१ जानेवारीपर्यंत आधार सीडिंग न झालेल्या लाभार्थ्यांचे अनुदेय धान्य पुढील महिन्यापासून आधार सीडिंग होईपर्यंत निलंबित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लाभार्थी धान्यापासून वंचित राहू नये, यासाठी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी केले. या शिधापत्रिकांवर मागील तीन महिन्यांपासून धान्य उचल न करणाऱ्या सर्व शिधापत्रिका तपासणीअंती तात्पुरत्या निलंबित करण्यात येईल किंवा धान्य अनुदान नसलेल्या योजनेत वर्ग करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे कामठी तालुक्यातील अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब योजना व एपीएल शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांनी त्यांचा आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडे जमा करून आधार व मोबाईल क्रमांक सीडिंग करावे, असे आवाहन पुरवठा निरीक्षण अधिकारी संदीप शिंदे यांनी केले आहे.