कोठारी ज्वेलर्स अहिंसा अवॉर्डचे वितरण : प्रफुल्ल पारख, सुरेश आग्रेकर सन्मानितनागपूर : समाजासाठी स्वत:ला झोकून देऊन निस्वार्थीपणे काम करणारे अनेक लोक असतात. प्रसिद्धीपासून दूर राहून समाजाच्या निकोपतेसाठी आणि भावी पिढ्यांसाठी काही कार्यकर्ते आयुष्य वेचतात पण त्यांचा म्हणावा तसा सन्मान होत नाही. अशा कार्यकर्त्यांचा सन्मान करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक असते. समाजासाठी निरपेक्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार आणि सन्मान करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात भावपूर्ण सत्काराला गीतसंगीताची जोड लाभली. याप्रसंगी नृत्य, गीत आणि नाटकांच्या सादरीकरणाने हा सन्मान सोहळा रंगला. जैन सेवा मंडळाच्यावतीने ‘कोठारी ज्वेलर्स अहिंसा अवॉर्ड’ सोहळ्याचे आयोजन डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात शनिवारी करण्यात आले. याप्रसंगी सात विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा आणि प्रमुख अतिथी म्हणून खा. अजय संचेती, नरेन्द्र कोठारी, जैन सेवा मंडळाचे अध्यक्ष मनीष मेहता, सतीश पेंढारी, गणेश जैन, गौतम जैन, सतीश जैन, घेवरचंदजी झामड, चंद्रकांत वेखंडे, प्रफुल्लभाई पारख, दिलीप गांधी, अभय पनवेलकर, सुमत लल्ला, प्रभात धाडीवाल, निखिल कुसुमगर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्त्यांच्या कामाचे स्वरूप आणि त्यांनी समाजासाठी केलेल्या कामाची माहिती एलसीडी प्रोजेक्टरवर प्रदर्शित करीत हा सोहळा भावपूर्णतेने आणि कृतज्ञतेचा भाव घेऊन पार पडला. या अवॉर्डसाठी समाजातून नामांकने मागविण्यात आली होती. एकूण सात पुरस्कारांसाठी १३० नामांकने जैन सेवा मंडळाला प्राप्त झाली. यातून पुरस्कारायोग्य उमेदवार निवडण्यासाठी विविध क्षेत्रातील दहा तज्ञ मान्यवरांची समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने प्रत्येक उमेदवाराला भेटून त्यांची मुलाखत घेतली आणि त्यातून योग्य नावांची निवड केली. एका समारंभात हे पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. कार्यक्रमात जैन समाजाच्या प्रतिभावंत कलावंतांनी गीत, संगीत, नृत्य आणि लोकनृत्यांच्या सादरीकरणाने रसिकांना बांधून ठेवले. जैन समाज मोठा आहे पण तो विखुरललेला आहे. समाज एकत्रित येणे आवश्यक असून जैन सेवा मंडळाच्या यंदाच्या हीरक महोत्सवी वर्षात सर्व जैन समाजाने एकत्रित येण्याचे आवाहन प्रमुख अतिथींनी यावेळी केले. सतीश पेंढारी यांनी पुरस्कारांची माहिती दिली. संचालन एजाज खान यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय नखाते, निखिल कुसुमगर यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)अशा पुरस्कारातून प्रेरणा मिळते : खा. विजय दर्डाकोठारी ज्वेलर्सच्यावतीने देण्यात येणारा अहिंसा अवॉर्ड सातत्याने १२ वर्षापासून देण्यात येत आहे. या पुरस्कारातून समाजासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना बळ आणि प्रेरणा मिळते. त्यांच्या कार्याचा गौरव होतो. त्यामुळेच हा पुरस्कार अतिशय महत्त्वाचा आहे. जैन सेवा मंडळाने अनेक नव्या समाजोपयोगी योजनांनाची मुहूर्तमेढ रोवली आहे. या योजना पूर्ण करण्यासाठी आपण शक्य ते सर्व सहकार्य करू. जैन समाजाची मोठी ताकद आहे. त्यामुळेच हा समाज एकत्रित असणे गरजेचे आहे. समाजाच्या एकत्रित पणासाठीच सकल जैन समाजाची स्थापना केली आणि त्याला देशभरात मोठा प्रतिसाद मिळतो आहे. जैन दिसणे सोपे आहे पण जैन बनणे कठीण आहे. सर्व जैन बांधवांनी एकत्रित महावीर जयंती साजरी करावी, असे आवाहन करतानाच त्यांनी आपण मंदिर खूप बांधतो पण समाजाच्या प्रगतीसाठी समोर येत नाही. आपण सर्वांनीच आपल्या साधूसंताना सहकार्य केले पाहिजे, असे ते म्हणाले.गीत संगीताची रंगत आत्मदीप सोसायटीतर्फे संचालित सरगम संगीत संस्थेच्यावतीने कलावंतांनी गीत, संगीत आणि नृत्यासह यावेळी रसिकांना जिंकले. कार्यक्रमाचा प्रारंभ मयंक साहूने ‘तुम आशा विश्वास हमारे...’ या गीताने केला. यानंतर त्याने अनूप जलोटा यांनी अजरामर केलेले ‘ऐसी लागी लगन...मीरा हो गयी मगन..’ या गीताने समां बांधला आणि रसिकांची दाद घेतली. शिवा वेद या लहान मुलीने यावेळी ‘सत्यम शिवम सुंदरम...’ गीत सादर करुन वातावरणात रंग भरला. आर्या कुमरे हिने ‘ओ सजना बरखा बहार आयी...’ गीत तयारीने सादर केले. यावेळी जैन सेवा मंडळाच्या विद्यार्थ्यांनी नाटुकले सादर करुन पर्यावरण वाचविण्याचा संदेश नृत्यनाट्यातून दिला. विविध रंगांचा पेहराव करुन रंगभूषेच्या माध्यमातून हा संदेश त्यांनी विविध फलकांच्या माध्यमातून उपस्थितांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविला. तर घुमर ग्रुपच्या महिलांनी राजस्थानचे घुमर नृत्य पारंपरिक वेशभूषेत नजाकतीने सादर करुन सर्वांचीच दाद घेतली.
सेवाव्रतींचा भावपूर्ण गौरव सोहळा
By admin | Updated: May 25, 2015 03:13 IST