लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : नवीन कामठी पाेलिसांनी दाेन वेगवेगळ्या केलेल्या कारवाईमध्ये गुरांची अवैध वाहतूक करणारे दाेन पिकअप वाहने पकडली. त्यात पाेलिसांनी २४ जनावरांची सुटका करीत जीवदान दिले. या कारवाईत वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्याकडून १४ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
नवीन कामठी ठाण्याचे पाेलीस पथक गस्तीवर असताना नागपूर-जबलपूर मार्गावरील साईबाबा मंदिर परिसरात त्यांना अनवर अली सय्यद (२६, रा. भाजीमंडी, कामठी) हा एमएच-३७/टी-३७७१ क्रमांकाचे पिकअप वाहन घेऊन कन्हान-कामठीमार्गे येताना दिसला. त्यांनी ते वाहन थांबवून झडती घेतली असता, त्यांना त्यात ११ बैल कोंबले असल्याचे आढळून आले. ती गुरांची अवैध वाहतूक असल्याचे तसेच ती जनावरे कत्तलखान्यात नेली जात असल्याचे कागदपत्रांच्या तपासणीदरम्यान स्पष्ट होताच पोलिसांनी वाहन व जनावरे असा एकूण ७ लाख २० हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
दरम्यान, साेमवारी (दि.४) सकाळी ८ वाजताच्या सुमारास गादा शिवारात केलेल्या कारवाईत एमएच-४०/बीएल-६२२५ क्रमांकाचा वाहनचालक पाेलिसांना पाहून वाहन साेडून पसार झाला. पाेलिसांनी वाहनाची झडती घेतली असता त्यांना १३ जनावरे काेंबलेली आढळली. पिकअप वाहन व जनावरे असा एकूण ६ लाख ९५ हजार रुपयाचा मुद्देमाल पाेलिसांनी जप्त केला. दाेन्ही कारवाईमध्ये वाहनचालकांविरुद्ध गुन्हा नाेंदवून त्यांच्याकडून एकूण १४ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. सर्व जनावरे कामठीतील गाेरक्षणालयात सुरक्षित ठेवली आहेत. ही कारवाई ठाणेदार संजय मेंढे यांच्या मार्गदर्शनात सहायक पाेलीस निरीक्षक सुरेश कन्नाके, हेड काॅन्स्टेबल पप्पू यादव, विनायक आसटकर, मंगेश लांजेवार, मंगेश यादव, राजेंद्र टाकळीकर, सुधीर कनोजिया, उपेंद्र यादव, संदीप गुप्ता, मनोहर राऊत, अमोल डोंगरे, नीलेश यादव यांच्या पथकाने केली.