लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर : पृथ्वी एकमेव असा ग्रह आहे, ज्यावर जीवसृष्टी जिवंत आहे. या जीवसृष्टीसाठी पाणी महत्त्वाचे असून, पाण्याचे संवर्धन व जतन करणे काळाची गरज आहे. पाण्याचा अपव्यय टाळला पाहिजे, असे प्रतिपादन भिवापूरचे न्या. विनोद डामरे यांनी केले.
तालुका विधिसेवा समितीच्या वतीने न्यायालयाच्या सभागृहात आयोजित जागतिक जलदिन कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी सरकारी अभियोक्ता ॲड. कैलास कन्नाके, ॲड. प्रभाकर नागोसे, नरहरी पेंदाम आदी उपस्थित होते. कार्यक्रमात कायदेविषयक अधिकाराची माहिती देताना कुणीही न्यायापासून वंचित राहू नये, हे कायद्यामध्ये अंतर्भूत असून, कायद्यासमोर सर्व समान असल्याचेही न्या. विनोद डामरे यांनी सांगितले. येत्या १० एप्रिल राेजी लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले असून, आपसी वाद सामंजस्याने सोडवा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार नरहरी पेंदाम यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयाेजनासाठी राजेश झोडे, छाया कुकडे, अतुल राखडे, युवराज गडपायले, संगीता झोडे, जे. एन. राखुंडे, योगेश ढवळे आदींनी सहकार्य केले.