लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जल, जमीन आणि जंगल हे या देशाची संपत्ती आहे. हीच संपत्ती देशाच्या आर्थिक विकासाचा आधार होऊ शकते. त्यामुळे स्वदेशीचे महत्त्व जाणून ग्रामीण, कृषी व वनवासी भागात जास्तीत जास्त विकास झाला पाहिजे. आज परत एकदा महात्मा गांधी यांनी मांडलेला ‘चलो गाव की ओर’ या विचारावर चालण्याची गरज असून, हाच विचार देशाच्या अर्थव्यवस्थेचा आधार असल्याचे मत केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.अखिल भारतीय ग्राहक पंचायत विदर्भ प्रांतच्या वतीने दत्तोपंत ठेंगडी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘दत्तोपंताचे अर्थचिंतन’ या विषयावर नितीन गडकरी यांच्या व्याख्यानाचे आयोजन शनिवारी टिळक पत्रकार भवनाच्या सभागृहात करण्यात आले होते. या व्याख्यानातून नितीन गडकरी यांनी दत्तोपंत ठेंगडी यांचे आर्थिक विचार सभागृहात मांडले. गडकरी म्हणाले की, दत्तोपंत ठेंगडी यांनी जे अर्थचिंतन केले त्यात गाव समृद्ध झाले पाहिजे. गावातील नैसिर्गक स्रोतावर संशोधन करून गावाचे आर्थिक परिवर्तन झाल्यास, शहराच्या समस्या सुटू शकतात. स्वदेशीचे तंत्रज्ञान आणि आधुनिक तंत्रविज्ञान या दोघांच्या आधारावर भविष्याचा समाज उभा करण्याचे विचार ठेंगडी यांनी मांडले होते. त्यामुळे ठेंगडी यांच्या सामाजिक आणि आर्थिक विचाराचे संशोधन होणे गरजेचे असल्याचे मत गडकरी यांनी व्यक्त केले.यावेळी त्यांनी टेक्नॉलॉजीचे महत्त्व पटवून सांगत, जी टेक्नॉलॉजी लोकांना बेरोजगार करीत असेल ती टेक्नॉलॉजी मला मान्य नाही. जास्तीत जास्त लोकांच्या सहभागातून जास्तीत जास्त उत्पादन झाले पाहिजे. हीच गोष्ट दत्तोपंत ठेंगडी यांनी सांगितली. यावेळी गडकरी यांच्या हस्ते अ.भा. ग्राहक पंचायतचे शिल्पकार बापू महाशब्दे यांच्या जीवनावर आधारित स्मृतिग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला राष्ट्र सेविका समितीच्या माजी संचालिका प्रमिलाताई मेढे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत सहसंचालक श्रीराम हरकरे, अ.भा. ग्राहक पंचायतचे राष्ट्रीय संघटन मंत्री दिनकर सबनीस, ग्राहक पंचायतचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अशोक त्रिवेदी, विदर्भ प्रांतच्या अध्यक्ष स्मिता देशपाडे, अमर महाशब्दे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन पांडे यांनी केले. संचालन नीता खोत यांनी केले. आभार अनिरुद्ध गुप्ते यांनी मानले. कार्यक्रमाला नैना देशपांडे, उदय दिवे, दत्तात्रय कठाळे, नरेंद्र कुळकर्णी, गणेश शिरोळे, श्रुती शिरोळे आदींचे सहकार्य लाभले.
'चलो गाव की ओर' हाच देशाच्या अर्थव्यवस्थेचा आधार : नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 23:56 IST
आज परत एकदा महात्मा गांधी यांनी मांडलेला ‘चलो गाव की ओर’ या विचारावर चालण्याची गरज असून, हाच विचार देशाच्या अर्थव्यवस्थेचा आधार असल्याचे मत केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
'चलो गाव की ओर' हाच देशाच्या अर्थव्यवस्थेचा आधार : नितीन गडकरी
ठळक मुद्देस्वदेशीचे महत्त्व समजण्याची गरज