नागपूर : ठरावीक दिवसात लोकांची काम व्हावीत याकरिता शासनाने ‘सेवा हमी कायदा’ केला आहे. त्यानंतरही एकाच कामासाठी लोकांना शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागतात. त्याचा लोकांना शारीरिक आणि मानसिक त्रास होतो. कर्मचाऱ्यांच्या ‘लेटलतिफी’चा अनुभव सेतू कार्यालयात लोकांना विविध प्रमाणपत्रे बनविताना येत आहे.
शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या कामाचा वेग सर्वांनाच माहीत आहे. केवळ एक प्रमाणपत्र बनविण्यासाठी लोक आपली सर्व कामे सोडून संपूर्ण दिवस रांगेत उभे राहतात आणि आपला क्रमांक येण्याची वाट बघतात. समजा खिडकीजवळ पोहोचले आणि कर्मचाऱ्यांच्या जेवणाची वेळ झाली तर ते कामे सोडून खिडकी बंद करतात. कर्मचाऱ्यांच्या अशा मनमानी व्यवहारामुळे लोकांना संपूर्ण दिवस केवळ एकाच कामासाठी खर्ची घालावा लागतो. कागदपत्रांमध्ये थोडीही चूक असेल तर कर्मचारी त्यात सुधारणा करून आणण्यास सांगताे. त्यानंतर कागदपत्रांच्या तपासणीसाठी नव्याने रांगेत उभे राहावे लागते. त्यात पुन्हा चूक आढळली तर कर्मचारी दुसऱ्या दिवशी बोलवितात. असा अनुभव सर्वांना येत असल्याने ‘नको ते शासकीय कार्यालय आणि नको ते काम’ अशी म्हण आता प्रचलित होऊ लागली आहे.
एकावेळी बनते केवळ एकच प्रमाणपत्र
सेतू कार्यालयात एकावेळी एकच प्रमाणपत्र बनविले जाते. जर एकपेक्षा जास्त प्रमाणपत्र बनवायचे असेल तर दुसऱ्या दिवशी पुन्हा रांगेत उभे राहावे लागते.
कागदपत्रांची तपासणी बनली डोकेदुखी
रहिवासी (डोमिसाईल) दाखला बनविण्यासाठी सेतू कार्यालयात दोन दिवसांपासून येणारी रवीना म्हणाली, सकाळपासून रांगेत उभी असून तीन तासानंतर क्रमांक आला आहे. एका कागदात त्रुटी आढळली तर पुढील कागद कर्मचारी तपासणार नाहीत. कर्मचाऱ्याने संपूर्ण कागदपत्रांची तपासणी करून त्रुटी सांगाव्यात. पण सेतू कार्यालयातील कर्मचारी एकावेळी संपूर्ण कागदपत्रांची तपासणी करीत नाहीत. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही कागदपत्रांची तपासणी करावीच लागते. लहान कामासाठी संपूर्ण दिवस वाया जातो आणि दुसरे काम होत नाही.
विद्यार्थी आणि पालक त्रस्त
शिवम बारावीचा विद्यार्थी आहे. त्याला कॉलेजमध्ये जमा करण्यासाठी उत्पन्नाचा दाखल आणि जात प्रमाणपत्राची गरज आहे. तो गेल्या चार दिवसांपासून सेतू कार्यालयात चकरा मारत आहे. कर्मचारी एकाचवेळी संपूर्ण माहिती देत नाही. उत्पन्नाच्या दाखल्यासाठी वडिलांची गरज असते. या कामासाठी त्यांनाही काम सोडून यावे लागत आहे. शिवम म्हणाला, येथे विशिष्ट प्रमाणपत्र काढण्यासाठी शासनाने लोकांना विस्तृत माहिती देणारा सूचना फलक लावावा.
पार्किंगसाठी त्रास
सेतूमध्ये कार्यालयात जाण्यासाठी काही ठिकाणी पेड तर काही ठिकाणी फ्री पार्किंग आहे. अनेक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र बनविण्यासाठी तीन ते चार दिवस सतत चकरा माराव्या लागतात. पेड पार्किंगमध्ये दुचाकी ठेवण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जातो. पार्किंगवरून अनेकदा वाद होत असल्याच्या लोकांच्या तक्रारी आहेत.
संपूर्ण परिसर अस्वच्छ
सेलू कार्यालय परिसरात नेहमीच अस्वच्छता असते. सफाई कर्मचारी परिसर साफ केल्यानंतर परिसरातच कचऱ्याचा ढीग लावतात. त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो. परिसर नियमित स्वच्छ ठेवण्याची लोकांची मागणी आहे.