लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : अलीकडच्या काळात बिबट्याचा सिंदी (ता. कळमेश्वर) परिसरात वावर वाढला आहे. त्या बिबट्याने गुरांची शिकार करायला सुरुवात केल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बिबट्याने गाेठ्यात बांधलेल्या गायीवर हल्ला चढवून तिची शिकार केल्याची घटना गुरुवारी (दि. ८) मध्यरात्री घडली असून, शुक्रवारी (दि. ९) सकाळी उघडकीस आली.
या भागात महिनाभरापासून बिबट्याचा वावर असल्याची माहिती सिंदी येथील अनेक शेतकऱ्यांनी दिली. रवींद्र माधवराव लोखंडे, रा. सिंदी, ता. कळमेश्वर यांची सिंदी शिवारात शेती असून, शेतात गाेठा आहे. बिबट्या गुरुवारी मध्यरात्री त्या गाेठ्यात बांधलेल्या गाईवर हल्ला चढवित तिची शिकार केली. रवींद्र लाेखंडे शुक्रवारी सकाळी दूध काढण्यासाठी शेतात गेले असता, त्यांना बिबट्याने गाईची शिकार केल्याचे आढळून आले.
महिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी अर्चना नाैकरकर यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठून पाहणी व पंचनामा केला. दुसरीकडे, वन विभागाने या बिबट्याचा कायम बंदाेबस्त करावा आणि रवींद्र लाेखंडे यांना बाजारभावाप्रमाणे मृत गाईची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सरपंच नितीन भाेयर यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.