नागपूर : दरवर्षी हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपुरात विधिमंडळ सचिवालयाचे कार्यालय सुरू केले जाते. अधिवेशन संपताच हे कार्यालयसुद्धा बंद करून ते मुंबईला सुरू होते. परंतु नागपुरातील विधिमंडळ सचिवालयाचे कार्यालय आता नागपुरात विधानभवन इमारतीत वर्षभर सुरू राहणार आहे. विधान परिषदेचे सभापती व विधानसभेचे अध्यक्ष यांच्या मंडळाने याबाबतचा निर्णय घेतला आहे.
यानुसार नागपूरच्या विधानभवन येथे विधानमंडळ सचिवालयाच्या नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या कार्यालयाचे उद्घाटन येत्या ४ जानेवारी राेजी दुपारी १.३० वाजता राष्ट्रकुल संसदीय मंडळ कक्ष, पहिला मजला, जुनी इमारत विधानभवन येथे आयोजित करण्यात आले आहे. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर व विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले हे प्रमुख अतिथी राहतील, असे विधानमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी कळविले आहे.