वसुलीसाठी धावपळ : मनपा व चेम्बर आॅफ कॉमर्सची संयुक्त बैठकनागपूर : आस्थापना व विकास कामासाठी महापालिकेला महिन्याला ७० कोटीची गरज आहे. परंतु स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी)पासून जेमतेम २० कोटीचे उत्पन्न आहे. जकात असताना चांगले उत्पन्न होते. परंतु आता त्यात घट झाल्याने मनपापुढे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी नाग विदर्भ चेम्बर आॅफ कॉमर्स(एनव्हीसीसी) येथे मनपाचे पदाधिकारी, अधिकारी व कॉमर्सचे पदाधिकारी यांची संयुक्त मंथन बैठक घेण्यात आली.एलबीटीमुळे मनपा आर्थिक संकटात आहे. दुसरीकडे एलबीटीच्या किचकट प्रक्रियेमुळे व्यापारी त्रस्त आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मनपातर्फे महापौर प्रवीण दटके, उपमहापौर मुन्ना पोकुलवार, स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे, सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, समिती सभापती गिरीश देशमुख ,आयुक्त श्रावण हर्डीकर आदींनी मनपाची बाजू मांडली. एनव्हीसीसीचे अध्यक्ष प्रकाश मेहाडिया व सचिव जयप्रकाश पारेख यांनी व्यापाऱ्यांची बाजू मांडली. दटके यांनी शहर विकासासाठी एलबीटी भरण्याचे आवाहन केले तर व्यापाऱ्यांनी एलबीटीच्या प्रक्रियेसंदर्भात प्रश्न उपस्थित केले. मनपाच्या एलबीटी विभागाचे मिलिंद मेश्राम यांनी शंकाचे निराकरण केले.रमेश सिंगारे यांनी मनपाच्या अभय योजनेची माहिती दिली. ३१ जुलैपर्यत अभय योजना असून याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. चर्चेत संतोष अग्रवाल, धर्मवीर शर्मा, आसनदास, असलम खान, हरगोविंद मुरारका आदींनी सहभाग घेतला.(प्रतिनिधी)
एलबीटी वसुलीवर मंथन
By admin | Updated: July 25, 2015 03:17 IST