मो. रफी आणि किशोर कुमारच्या गीतांचा नजराणा नागपूर : आपल्या गायकीने भल्याभल्यांना वेड लावणाऱ्या मो. रफी आणि किशोर कुमार यांच्या गीतांचा गोडवा आजही कायम आहे. याचा अनुभव आज साई सभागृहात आला. रविवारचा दिवस, त्यातही हुडहुडी भरणारी थंडी, वातावरण गार असताना, या दिग्गज गायकांच्या चाहत्यांनी मो. रफी आणि किशोरच्या गीतांच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत, रविवारची संध्याकाळ आनंदी केली. रत्ना कम्युनिकेशन व मो. रफी फॅन्स क्लबद्वारे ‘एक हँसी शाम’ या संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मो. रफी आणि किशोर कुमार यांच्या निवडक गीतांचा समावेश या कार्यक्रमात करण्यात आला होता. या गायकांनी अजरामर केलेल्या प्रेम गीतांच्या छटा या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाल्या. कार्यक्रमाची सुरुवातच ‘एक हँसी शाम को’ या गीताने विनोद दुबे यांनी केली. त्यानंतर प्रेमगीतांचा सिलसिलाच सुरू झाला. नागपूरचा किशोर म्हणून नावलौकिक मिळविलेल्या सागर मधुमटके रविवारची सांज ‘वो शाम कुछ अजिब थी’ हे गीत गाऊन आणखी गोड केली. त्यानंतर विलास डांगे आणि विनोद दुबे यांनी प्रेमाचे भाव डोळ्यातून व्यक्त करणारे ‘छलके तेरी आखों से’, ‘तेरी आख का जो इशारा’ हे गीत सादर केले. प्रेमात पडल्यानंतर सहकाऱ्याची प्रतीक्षा करण्याचा आनंदही काही वेगळा असतो. हा आनंद सागर आणि मंजिरीने ‘सुहानी रात ढल चुकी’ आणि ‘इन्तेहा हो गई इंतजार की’ ही गीते गाऊन रसिकांना आनंद दिला. मो. सलीम यांनीही ‘दर्दे दिल दर्दे जिगर’ हे गीत सादर केले. ‘नफरत की दुनिया को छोड के’, ‘इशारो इशारो मे’, ‘मेरी उमर के नौजवानो’, ‘लोग कहते है मै शराबी हु’ कार्यक्रमात सादर झालेल्या या गीतांना रसिकांनी भरभरून दाद दिली. (प्रतिनिधी)
‘एक हँसी शाम’ बहारदार सादरीकरण
By admin | Updated: December 22, 2014 00:40 IST