आयुक्तांकडे फाइल पाठविणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तीन दिवस अर्ध्या नागपूर शहरातील कचरा संकलन ठप्प होते. बीव्हीजी कंपनीच्या मनमानी कारभारामुळे ही परिस्थिती निर्माण झाली होती. मनपा प्रशासनाकडून कठोर कारवाई होत नसल्याने कंपनीकडून याची दखल घेतली जात नव्हती. कंपनीसंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच मनपा प्रशासनाला अखेर जाग आली. या कंपनीला अधिकाअधिक दंड आकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तीन दिवसांत सुमारे तीन लाख लोकांच्या घरातील कचरा उचलण्यात आला नव्हता.
यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. तसेच शहराच्या प्रतिमेलाही धक्का लागला होता. त्यानंतर आठवडा झाला तरी परिस्थितीत सुधारणा झाली नाही. याचा विचार करता कंपनीच्या बिलातून १० टक्के रक्कम कपात केली जाणार आहे. सुरुवातीला कारवाईला टाळाटाळ केली जात होती; परंतु ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून बीव्हीजी कंपनीचा मनमानी कारभार पुढे आणला होता. प्रशासनाची बदनामी होत असल्याने दंड आकारण्याची फाइल तयार करण्यात आली. ही फाइल मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविली जाणार आहे. आयुक्त काय निर्णय घेतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. कारवाई न केल्यास कंपनीचा मनमानी कारभार तसाच सुरू राहणार आहे. परिणामी, मनपाची प्रतिमा डागाळण्याची शक्यता आहे.
...
अधिकाधिक दंड आकारला जाणार
बीव्हीजी कंपनीच्या दंडाची फाइल तयार झाली आहे. आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठविली जाईल. दंड किती आकारला जाणार याबाबत तूर्त बोलणे उचित नसल्याचे उपायुक्त (घनकचरा) डॉ. प्रदीप दासरवार यांनी सांगितले.
....