नागपूर : पेंच नदीच्या पुरामुळे तिन्ही बाजूनी वेढलेल्या आणि एका बाजूने संरक्षित वनामुळे प्रतिबंधित क्षेत्र असलेले दुर्गम भागातील किरंगीसरा गाव पुन्हा एकदा प्रकाशमान झाले आहे. यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना जोखीम बाळगून नदीच्या पात्रात वीज यंत्रणा उभारावी लागली. अनेक दिवसाच्या सातत्यपूर्ण परिश्रमानंतर हे शक्य झाले. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे तोतलाडोह, नवेगावखैरी आणि चौराई धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता . त्यामुळे पेंच नदीमुळे तिन्ही बाजूने वेढलेल्या किरंगीसरा गाव पूर्णपणे पाण्याने वेढले गेले होते. पुराच्या पाण्यामुळे पेंच नदीच्या पात्रातील पोल कोसळून सुमारे ९०० मीटरची लाईन पाण्यात पूर्णपणे बुडाली होती. दळणवळणासाठी नावेतून जाणे हाच एकमेव पर्याय येथील गावकऱ्यापुढे होता. नदीच्या पाण्यात मगरीचे वास्तव्य असल्याने जीवाची जोखीम अधिक होती. परंतु तरीही वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गावाला अनेकदा भेट दिली. या दरम्यान महावितरणच्या प्रादेशिक कार्यालयाचे प्रभारी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, नागपूर ग्रामीण मंडळाचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे,सावनेर विभागाचे कार्यकारी अभियंता कुलदीप भस्मे यांनीही २६ ऑक्टोबरला नावेतून प्रवास करून किरंगीसरा येथे पाहणी केली होती. यानंतर येथे वीज यंत्रणा उभारण्याबाबत निर्देश दिले होते. यानंतर अधीक्षक अभियंता नारायण आमझरे येथे वारंवार भेटी देऊन वीज पुरवठा सुरु करण्यासाठी प्रयत्न केले. परंतु पुराचे पाणी कायम असल्याने वीज पुरवठा सुरू करणे अशक्य झाले होते. मागील महिन्यात पुराचे पाणी थोडे ओसरताच वीज यंत्रणा उभारण्याच्या कामाला गती मिळाली. वीज खांब नावेतून गावात नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. अखेर १५ डिसेंबरला किरंगीसरा गावाचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले.
अखेर किरंगीसरा झाले प्रकाशमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:10 IST