वाठोडा- भामटीतील ८.८८ हेक्टर जमीन देणार : दरमहा ७६.१४ लाख भाडे मिळणारनागपूर : आर्थिक संकटातून जात असलेल्या महापालिकेला आता मेट्रो रेल्वेच्या रूपात उत्पन्नाचा मार्ग गवसला आहे. मेट्रो रेल्वेच्या कास्टिंग यार्डसाठी महापालिका आपली मौजा वाठोडा येथील ५ हेक्टर व मौजा भामटी येथील ३.८८ हेक्टर येथील जमीन भाड्याने देणार आहे. या बदल्यात महापालिकेला मेट्रो रेल्वेकडून दरमहा ७६ लाख १३ हजार रुपये भाड्यापोटी मिळणार आहेत. मेट्रो रेल्वेला जमीन भाड्याने देण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळणेही निश्चित आहे. मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी महापालिकेला पाच टक्के खर्चाचा वाटा उचलायचा आहे. त्यामुळे ही रक्कम भाड्यापासून येणाऱ्या रकमेतून समायोजित करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. मौजा वाठोडा येथे खसरा क्रमांक १५९ व १६० येथे ५ हेक्टर खुली जमीन आहे. संबंधित जमीन चार वर्षांसाठी कास्टिंग यार्डकरिता अस्थायी स्वरूपात भाड्याने दिली जाईल. तसेच मौजा भामटी येथे आरेंज सिटी स्ट्रीट योजनेच्या सेक्टर ७ मध्ये रिकामी असलेली ३.८८ हेक्टर जागा देखील यार्डसाठी भाड्याने दिली जाईल. वाठोड्याच्या जमिनीचे दरमहा २८.६० लाख रुपये भाडे मिळेल. तर, भामटी येथील जमिनीचे ४७ लाख ५३ हजार ३२० रुपये भाडे मिळेल. प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला मेट्रो रेल्वेला महापालिकेच्या खात्यात रक्कम जमा करणे बंधनकारक असेल. दरवर्षी रेडीरेकनरच्या दरानुसार भाड्यात वाढ होईल. संबंधित जागा रिकामी करण्याचा महापालिकेला अधिकार असेल. यासाठी फक्त ३० दिवसांपूर्वी नोटीस द्यावी लागेल. या जमिनीवर कुठलेही अस्थायी बांधकाम करण्यासाठी महापालिकेची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल. सुरक्षेबाबत निश्चित केलेल्या दिशानिर्देशांचे पालन करावे लागेल. (प्रतिनिधी)
मेट्रो रेल्वेसाठी मनपा देणार भाड्याने जमीन
By admin | Updated: May 21, 2016 02:52 IST