रामटेक : रामटेकपासून १० किमी अंतरावर असलेल्या पटगोवरी येथे दोन महिलांची शेतामध्ये मोबाइल टॉवर उभारण्याच्या नावाखाली शेतजमीन हडपून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी बद्रदोजा तस्लीम उद्दीम खान (३३) व हुमा बद्रदोजा खान (२९) रा.आदर्श नगर, दिघोरी नागपूर यांनी लीलाबाई केशव कामडे (५८) रा. लालगंज बस्तरवारी, नागपूर व कलाबाई सुधाकर केळेकार रा.कन्हान यांना शेतामध्ये मोबाईल टॉवर उभारल्यास महिन्याला ४० हजार रुपये भाडे मिळेल, असे सांगितले होते; पण यासाठी करारनामा करावा लागेल, अशी अट त्यांनी संबंधित महिलांना टाकली होती. त्यांनी या दोन्ही महिलांकडून खोटा करारनामा करून सरळ जमिनीचे विक्री पत्र केले. ही जमीन हुमा खान हिच्या नावे केली. ही जमीन पटगोवरी येथील आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून प्रथम वर्ग न्यायालय रामटेक यांच्या आदेशान्वये फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १५६ (३) अन्वये सदर गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणी रामटेक पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही आरोपी विरुद्ध भादंवि कलम ४२० ,४६८,४७१,३४ अन्वये गुन्हा नोदविला आहे. आरोपीचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बोरकर करीत आहेत.
मोबाइल टॉवरच्या नावावर जमीन हडपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:09 IST