३६ तासांत ११९.६ मिमी पाऊसनागपूर : उपराजधानीत रविवारी दुपारपासून संततधार पावसाचा जोर मंगळवारी दिवसभर कायम होता. गेल्या ३६ तासांत नागपूर जिल्ह्यात ११९.६ मिमी.पावसाची नोंद करण्यात आली आहे. पावसाने झोडपल्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले असून काही वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. जिल्ह्यात जवळपास अशीच स्थिती असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार उपराजधानीत मंगळवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ८.३० वाजेपर्यंत ७७.४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली . सोमवारी सकाळी ८.३० ते मंगळवार सकाळपर्यंत ४२.२ मिमी पाऊस नोंदविण्यात आला होता. येत्या २४ तासांत आणखी मुसळधार पाऊस येण्याचा अंदाज हवामान खात्यातर्फे नोंदविण्यात आला आहे. (प्रतिनिधी)१३ फिडर्सवर ब्रेकडाऊन मुसळधार पावसाचा सामान्य नागरिकांसोबतच स्पॅन्को नागपूर डिस्कॉम लिमिटेडलाही (एसएनडीएल) फटका बसला. पाऊस व वाऱ्यामुळे दिवसभरात १३ फिडर्सवर ब्रेक डाऊन झाला. यामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. वांजरा फिडरवर ४० मिनिटांचे ब्रेकडाऊन झाले होते. यामुळे अन्सारी प्लास्टिक कंपनी व डांबर फॅक्टरी परिसरातील वीजपुरवठा प्रभावित झाला होता. तसेच लाडीकर ले-आऊट, बिनाकी व बिजलीनगर येथील फिडर्सवरही ब्रेकडाऊन झाले होते. शिवाय सायं. ६ वाजताच्या सुमारास मानकापूर सबस्टेशनवर स्पार्क झाल्याने अचानक नऊ फिडर्सवर ब्रेकडाऊन झाले होते. यामुळे काटोल रोड, सदर, आरबीआय चौक, सिव्हिल लाईन्स व धरमपेठ परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. एसएनडीएलची चमू रात्री उशिरापर्यंत या सर्व फिडर्सवरील बिघाड दूर करून, वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रयत्न करीत होती. विमान मुंबईला परतलेवाईट हवामानामुळे वातावरणामुळे एअर इंडियाचे ६२९ क्रमांकाचे विमान नागपूरच्या आकाशात येऊन पुन्हा मुंबईकडे परतले. यामुळे परतीच्या प्रवासात या विमानाने मुंबईला जाणाऱ्या ६२ प्रवाशांवर रात्री उशिरापर्यंत विमानतळावर ताटकळत बसण्याची पाळी आली. दरम्यान प्रवाशांनी विमानतळावर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. एअर इंडियाने मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची भोजनाची व्यवस्था केली. रात्री उशिरापर्यंत मुंबईवरून पुन्हा विमान आल्यास परत जा, प्रवासाचे पैसे परत घ्या किंवा सकाळी असलेल्या ८.३० वाजता एअर इंडियाच्या विमानाने मुंबईला जा असे पर्याय प्रवाशांपुढे ठेवण्यात आले. रात्री उशिरापर्यंत मुंबईवरून विमान येणार आहे की नाही, याची माहिती प्रवाशांना देण्यात आली नव्हती.रेल्वेगाड्या लेट सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत होत्या. दरम्यान, उशिराने येणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय होऊन त्यांना रेल्वेस्थानकावर ताटकळत बसण्याची पाळी आली होती. दरम्यान, उशिराने येणाऱ्या रेल्वेगाड्यात १२२९५ बंगळूर-पटना संघमित्रा एक्स्प्रेस ३.१५ तास, २२३५२ यशवंतपूर-पाटलीपुत्र एक्स्प्रेस १.४० तास, १२७९२ पटना -सिकंदराबाद एक्स्प्रेस ३ तास, १२२९६ पटना-बंगळूर संघमित्रा एक्स्प्रेस ३ तास, १२९९४ पुरी-गांधीधाम एक्स्प्रेस १.१५ तास आणि १२६२२ नवी दिल्ली-चेन्नई तामिळनाडू एक्स्प्रेस २ तास या गाड्यांचा समावेश आहे. उशिरा येणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे वेटिंग रूम हाऊसफुल्ल होऊन प्लॅटफॉर्मवरही प्रवाशांची गर्दी पाहावयास मिळाली.एसटीच्या फेऱ्या रद्दपावसामुळे नागपूर जिल्ह्यातील वाहतूकही काही ठिकाणी विस्कळीत होऊन एस. टी. महामंडळाला आपल्या काही फेऱ्या रद्द करण्याची पाळी आली. यात रामटेक-भंडारा, रामटेक-तुमसर हा मार्ग दुपारी १२ नंतर बंद करावा लागला. अरोलीजवळ रस्त्यावर नाल्याचे पाणी आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. यात एसटी महामंडळाला आपल्या १२ फेऱ्या रद्द करण्याची पाळी आली. याशिवाय जिल्ह्यात चिमूर, भिसी मार्गावरील वाहतूकही बंद झाली. उमरेड-जवळीच्या ६ फेऱ्या, उमरेड भिसीच्या ८ फेऱ्या, उमरेड-चिमूरच्या १२ फेऱ्या, उमरेड-तारणाच्या १२ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. बालाघाटजवळ रजेगाव येथेही रस्त्यावर पाणी आल्यामुळे नागपूर-रजेगाव ही फेरी आंजी-आमगाव या मार्गाने वळविण्याचा निर्णय एसटी महामंडळाला घ्यावा लागला.
कोसळधार
By admin | Updated: July 23, 2014 01:02 IST