दिनकर ठवळे
कोराडी : जिल्ह्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या कोराडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे राजकीय पोलपंडितांचे लक्ष लागले आहे. १७ सदस्यीय असलेल्या या ग्रा.पं.साठी भाजप समर्थित आदर्श ग्राम विकास आघाडी तर परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना आघाडीने दंड थोपाटले आहेत. गत २० वर्षापासून ही ग्रा.पं.भाजपाच्या ताब्यात आहे. त्यामुळे यावेळी कोराडीचे मतदार नवा आदर्श निर्माण करणार की परिवर्तन घडविणार, हे १८ जानेवारीलाच स्पष्ट होईल. सध्या मात्र गावात प्रचाराचा धुराळा उडाला आहे. मात्र येथे काही वॉर्डात प्रहारने डोके वर काढल्याने याचा कुणाला फटका बसेल, हेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.
कोराडी हे भाजपचे प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे होमटाऊन आहे. कोराडीचा किल्ला ते स्वत:च लढवित आहेत. महाविकास आघाडीच्या वतीने येथे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुरेश भोयर व जिल्हा परिषद सदस्य नाना कंभाले यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कोराडीत एकूण ६ वॉर्डातील १७ जागांसाठी ४३ उमेदवार आहेत. यात २३ महिला तर २० पुरुष उमेदवारांचा समावेश आहे.
वॉर्ड क्रमांक ६ मधून तीन उमेदवार निवडून द्यावयाचे असून या ठिकाणी एकास एक अशीच लढत आहे. वाॅर्ड क्रमांक १ ते ४ मध्ये आघाडी व भाजप उमेदवाराच्या व्यतिरिक्त प्रत्येकी एक अपक्ष उमेदवार मैदानात आहे. वॉर्ड क्रमांक १, २ व ४ मध्ये प्रत्येकी तीन उमेदवार निवडून द्यायचे आहेत. वॉर्ड क्रमांक ३ मधून दोन उमेदवारांना विजयी करायचे आहे. मोठी लढत ही वॉर्ड क्रमांक ५ मध्ये होईल. या ठिकाणी भाजप व आघाडीच्या उमेदवाराव्यतिरिक्त पाच अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी तिघे उमेदवार प्रहारचे समर्थक मानले जातात. या वॉर्डात दोन जागांवर काँग्रेस समर्थकांनी वेगळी चूल मांडली आहे. याच वॉर्डातील आघाडीचे उमेदवार वासुदेव बेलेकर हे वॉर्ड क्रमांक २ मधूनही नशीब अजमावित आहेत.
माजी सरपंच, उपसरपंचही मैदानात
या निवडणुकीत माजी सदस्य नरेंद्र धानोरे, देवेंद्र सावरकर, मंदा पारवे, माजी सरपंच चंद्रशेखर बिरखेडे, माजी सदस्य निर्मला मोरई, माजी उपसरपंच उमेश निमोणे, अर्चना दिवाने, माजी सरपंच माया डोंगरे, माजी सदस्य मंदा बनसोड आदी आपले भाग्य पुन्हा आजमावत आहेत.
अशी आहे कोराडी ग्रामपंचायत
औष्णिक विद्युत केंद्र व श्री महालक्ष्मी जगदंबेच्या अस्तित्वाने सर्वदूर परिचित असलेल्या कोराडी ग्रामपंचायतचा विस्तारही मोठा आहे. खापरखेडा-कोराडी रोडवर असलेल्या खापरी या छोट्या वसाहतीपासून तर नागपूर रोडवर असलेल्या पांजरा या गावापर्यंतचा भाग कोराडीमध्ये आहे. एका टोकाला खापरी तर दुसऱ्या टोकाला पांजरा. मध्यंतरी वीज वसाहतीचा छोटासा भाग, कोराडीची नवीन वसाहत, नवीन नांदा, आदर्श नगर झोपडपट्टी आदी भागांचा समावेश कोराडी ग्रामपंचायतच्या क्षेत्रात आहे. कोलार नदीपासून तर पांजऱ्याला लागून असलेल्या महानगरपालिकेच्या नारा या वसाहतीपर्यंत कोराडी ग्रामपंचायतची हद्द आहे.
एकूण वॉर्ड - ६
एकूण सदस्य - १७
एकूण उमेदवार - ४३
एकूण मतदार - ७,८७७
पुरुष मतदार - ३,९५०
महिला मतदार- ३,९२७