लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - तरुणीचा मोबाईल नंबर दुसऱ्या व्यक्तीला दिल्याच्या कारणाने तरुणांच्या दोन गटात वाद पेटला. दोन्ही गटाने एकमेकांवर त्यामुळे चाकू, लाठ्या, ब्लेडने हल्ला चढवला. यात चार जणांना जबर दुखापत झाली. पाचपावलीतील अशोक नगरात शनिवारी रात्री ही घटना घडली. यामुळे या भागात मध्यरात्रीपर्यंत तणावाचे वातावरण होते.
राहुल ऊर्फ दद्या इंगळे, रोशन पांडे, हिमांशू फुले, अभिजित इंगळे आणि त्यांच्या तीन ते चार साथीदारांनी शनिवारी रात्री ११. ३० च्या सुमारास कैलास युवराज रामटेककर (वय २३, रा. अशोक चाैक) याला गाठले. तरुणीच्या मोबाईल नंबरची गोष्ट तू तिच्या भावाला का सांगितली, असा प्रश्न करून आरोपी दद्दा इंगळे आणि साथीदारांनी चाकू हल्ला चढवला. ते पाहून मदतीला धावलेले कैलासचे मित्र यश यादव, राहुल मडावी, पवन बरबटे आणि अनुराग रामटेककर यांच्यावरही आरोपींनी लाठ्याकाठ्यांनी हल्ला चढवला. आरोपी रोशन पांडेने धारदार ब्लेडने यश व अनुरागला मारून त्यांना गंभीर जखमी केले. १५ ते २० मिनिटे चाललेल्या या हाणामारीमुळे त्या भागात प्रचंड दहशत आणि तणाव निर्माण झाला. रामटेककरसह तिघे या हल्ल्यात जबर जखमी झाले तर त्याच्या साथीदारांनी हल्ला करणाऱ्या आरोपींना तसेच उत्तर दिल्यामुळे राहुल ऊर्फ दद्दा हासुद्धा जबर जखमी झाला.
----
दोन्ही गटांवर गुन्हे दाखल
माहिती कळताच पाचपावलीचा पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी आरोपींपैकी काहींना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. रामटेककरच्या तक्रारीवरून आरोपी दद्दा इंगळे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध तर दद्दाच्या तक्रारीवरून कैलास रामटेककर आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला.
----