नागपूर : अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कैलासनगर येथून एका नऊ वर्षीय मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. डी. खोचे यांच्या न्यायालयाने मुख्य सूत्रधाराचा जामीन अर्ज फेटाळून लावला. आतिष ऊर्फ पिंटू उत्तम गवळी (२७) रा. चंद्रनगर, असे आरोपीचे नाव आहे. सोमेश्वर गणेश समर्थ रा. कैलासनगर, असे अपहृत मुलाचे नाव आहे. अपहरणाची घटना १५ डिसेंबर २०१५ रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली होती. या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी, अपहृत मुलाच्या नातेवाईक तरुणीचे आतिषसोबत गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. अतिष हा दारूच्या नशेत या तरुणीला मारहाण करीत असल्याने तिने त्याला भेटणे टाळले होते. ती आपणास भेटावी म्हणून अतिषने आपला साथीदार राहुल ऊर्फ शिंकू श्यामदुलारे यादव (२७) याला सोबत घेऊन मोटरसायकलने सोमेश्वर याचे अपहरण केले होते. घटनेच्या एक दिवसापूर्वी आतिषने आपल्या प्रेयसीला ‘तू मला भेटली नाही तर तुझ्या कुटुंबातील लोकांचे अपहरण करून खून करून टाकील’, अशी धमकी दिली होती. अपहृताच्या जिवाला धोका असल्याचे समजताच अजनी पोलिसांनी अपहरणकर्त्यांविरुद्ध भादंविच्या ३६३, ३६४, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. अपहृत आणि अपहरणकर्त्यांचा कसून शोध सुरू असतानाच १७ डिसेंबर रोजी अपहरणकर्त्यांनी समोश्वर याला अजनी भागातील मानवता शाळेजवळ सोडून दिले होते. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
नऊ वर्षीय मुलाचे अपहरण म्होरक्यास नाकारला जामीन
By admin | Updated: January 23, 2016 03:05 IST