काँग्रेस आणि भाजपसमर्थित पॅनेलमध्ये थेट लढत
सावनेर : महाविकास आघाडीच्या निवडणुका एकसंघ होऊन लढण्याचा संकल्प केला आहे. मात्र, सावनेर तालुक्यात निवडणूक होऊ घातलेल्या बहुतांश ग्रा. पं. मध्ये काँग्रेस आणि भाजपसमर्थित पॅनेलमध्ये थेट लढत होताना दिसत आहे.
तालुक्यातील खुबाळा या गट ग्रामपंचायतमध्ये हिंगणा, रिसाळा आणि खुबाळा असे तीन गावे येतात येथे एकूण ९ जागांसाठी १९ उमेदवार रिंगणात आहेत. खुबाळा ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपत समर्थित पॅनेलमध्ये अटीतटीचा सामना होणार आहे. येथे काँग्रेसचे माजी सरपंच यादव ठाकरे आणि खुशाल खुबाळकर तर भाजपचे वामन खुबाळकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नांदोरी गट ग्रामपंचायतीत नंदापूर आणि नांदोरी असे दोन गावे येतात. येथे ७ जागांसाठी १३ उमेदवार रिंगणात आहेत. नांदोरी ग्रामपंचायतीवर भाजपसमर्थित गटाचे वर्चस्व राहिले आहे. यावेळी मात्र येथे काँग्रेस समर्थित पॅनेलने येथे परिवर्तनाचा संकल्प केला आहे. येथे वॉर्ड क्रमांक १ मधून मंगला कोनगरे या बिनविरोध विजयी झाल्या आहेत. या ग्रा. पं. साठी काँग्रेसचे शंकर घोडमारे, मनोज बनसोड तर भाजपच्या वतीने हेमराज डोळस आणि चंंद्रभान पाचपुते यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
खुबाळा ग्रा.पं.
एकूण वाॅर्ड - ३
एकूण सदस्य - ९
एकूण उमेदवार - १९
एकूण मतदार - २१९४
पुरुष मतदार - ११५३
महिला मतदार : १०४१
------------
नांदोरी ग्रा.पं.
एकूण वॉर्ड - ३
एकूण सदस्य - ७
एकूण उमेदवार - १३
एकूण मतदार - १३४७
पुरुष मतदार : ६७८
महिला मतदार : ६६९