नागपूर : मोबाईल व्यापारी उत्तर नागपुरातील सुगतनगर येथील रहिवासी भरत खटवानी यांची हत्याकांडाचा तपास पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी एका आदेशान्वये शहर गुन्हे शाखेकडे सोपविला. खटवानी यांची हत्या खंडणी वसुलीतून नव्हे तर प्रॉपर्टीच्या वादातून झाल्याची माहिती पुढे येत आहे. भरत खटवानी यांची हत्या ७ मार्च रोजी तेलीपुरा इलेक्ट्रॉनिक मार्केट येथील त्यांच्याच हॅलो वर्ल्ड या मोबाईलच्या दुकानात करण्यात आली होती. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी सूत्रधार शेख शरीफ शेख सलीम, त्याचा भाऊ शेख अशफाक शेख सलीम दोन्ही रा. तेलीपुरा सीताबर्डी, छोटा ताजबाग येथील शेख अय्युब ऊर्फ पिंकी शेख असलम , आकाश ऊर्फ काल्या चंद्रकेश सरोज रा. सीताबर्डी, शुभम देवराव रामटेके , जितेंद्र ऊर्फ जितू दिनेश जाधव दोन्ही रा. गुजरवाडी, सौरव ऊर्फ आंबा विलासराव आंबटकर रा. श्रीनगर नंदनवन, निक्कू ऊर्फ नितेश शंभू तांबे रा. मेकोसाबाग, प्रकाश रमेश सुगंधपात्रे रा. तेलीपुरा सीताबर्डी आणि बारा सिग्नल येथील एक विधी संघर्षग्रस्त बालक, अशा दहा जणांना अटक केली. पोलिसांना या गुन्ह्यात आणखी चार आरोपी पाहिजे असून त्यापैकी एक कामठी आणि दुसरा एमआयडीसी येथील रहिवासी आहे. सूत्रांच्या माहितीनुसार खटवानी यांनी चार वर्षापूर्वी इलेक्ट्रॉनिक्स बाजारात दुकान खरेदी केले होते. या दुकानाच्या सौद्यावरून वाद सुरू होता. खटवानी हे शरीफला नियमित खंडणी देत असल्याचीही माहिती आहे. त्यामुळे खंडणी वसुलीवरून त्यांची हत्या होण्याची शक्यता कमी आहे. खटवानीच्या कुटुंबीयांनीही पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रॉपर्टीच्या वादातून हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. दरम्यान गुरुवारी गुन्हे शखेने प्रकाश सुगंधपात्रे आणि शेख अय्युब यांना प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी आर. बी. राजा यांच्या न्यायालयात हजर करून आरोपींचा २६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी रिमांड मागितला. न्यायालयाने उद्यापर्यंत एक दिवसाचा पोलीस कोठडी रिमांड मंजूर केला. न्यायालयात आरोपीच्यावतीने अॅड. प्रफुल्ल मोहगावकर आणि अॅड. पराग उके यांनी काम पाहिले.
खटवानी हत्याकांडाचा तपास गुन्हे शाखेकडे
By admin | Updated: March 20, 2015 02:42 IST