खापरी : वाहनांची जास्त वर्दळ असणाऱ्या नागपूर ग्रामीण तालुक्यातील खापरी नाका ते खापरी चौक पर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली आहे. रस्त्यात ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून वाहन चालकांसाठी हा रस्ता धोकादायक झाला आहे. खड्ड्यात वाहने आदळून वाहनांचे नुकसान होत आहे. तसेच खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात येथे अपघात होण्याचीही शक्यता वाढली आहे. हा रस्ता दुरूस्ती करण्याकडे मात्र प्रशासनाचे पुरते दुर्लक्ष केले आहे. अवजड व मोठ्या वाहनांच्या तुलनेत येथे दुचाकींची वाहतूक जास्त आहे. अवजड व चारचाकी वाहनेही या रस्त्यावरून ये-जा करत असतात. सायंकाळच्या वेळी रहदारी वाढलेली असते. रस्ता क्राॅस करताना आजूबाजूच्या वाहनांचा अंदाज न घेता वाहने आणली जातात. त्यामुळे किरकोळ अपघात कायमच होत असतात. या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या आधीही या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. मात्र यावर कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाही. प्रशासनाच्या वतीने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी युवा सेनेचे विठ्ठल जुमळे, प्रवीण इंगळे, राजू झाडे, सूर्यकांत कावळे, कुंदन अवधरे आदींनी केली आहे.
अपघाताला आमंत्रण देणारा खापरी नाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:10 IST