नागपूर : उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ झालेल्या दारू पार्टीची चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. काही दिवसांपूर्वी उमरेड-कऱ्हांडला अभायरण्याजवळ दारूच्या मोठ्या प्रमाणात बॉटल्स् आढळल्या होत्या. येथे काही पर्यटकांकडून पार्टी करण्यात आल्या माहिती आहे. लोकमतने यासंदर्भत २ फेब्रुवारी रोजी वृत्त प्रकाशित करीत या गैरशिस्तीचे जिल्हा प्रशासन आणि वनविभागाकडे लक्ष वेधले होते. याची दखल घेत पालकमंत्र्यांनी पेंच व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षकांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच या प्रकाराला खतपाणी न घालता दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी व तसा अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. विशेषत: शनिवारी आणि रविवारी कऱ्हांडला अभ्ययारण्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पर्यटक आणि युवकांकडून दारू पार्ट्या होत असल्याच्या तक्रारी मिळत आहे. वन विभागाकडे तशा तक्रारीही करण्यात आल्या आहेत. येथील कुटीरमध्ये दारूची बॉटल्स आणि कचरा सर्वत्र असल्याचे दिसून आले आहे. काही सुजाण पर्यटकांनी हे वास्तव चित्रितही केले आहे. वनविभागाच्या नियमानुसार अभयारण्य आणि परिसरात दारूच्या बॉटल्स आढळणे गैर आहे, असे असतानाही येथे असे प्रकार सर्रास घडत आहेत. मात्र कऱ्हांडला अभयारण्यांशी संबंधित अधिकाऱ्यांनी कुटीर प्रवेशद्वाराच्या बाहेर असल्याचे कारण देत याप्रकरणी हात वर केले आहे. (प्रतिनिधी)
कऱ्हांडला दारू पार्टीची चौकशी होणार
By admin | Updated: February 6, 2016 03:15 IST