लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - तब्बल ४४ गुन्हे दाखल असलेल्या एका अट्टल गुन्हेगाराने पोलिसांची चाैकशी चुकविण्याकरिता डावबाजी केली. मात्र, त्याची ती डावबाजी त्याच्या अंगलट आली असून पोलीस आता त्याची नव्याने चाैकशी करण्याच्या तयारीला लागले आहे.
शहनवाज ऊर्फ शेखू नामक अट्टल गुन्हेगार परिमंडळ ५ मध्ये राहतो. तो अनेक वर्षांपासून गुन्हेगारीत सक्रिय असून त्याच्याविरुद्ध ४४ गंभीर गुन्हे दाखल आहेत. खंडणी तसेच अन्य एका गुन्ह्यात त्याच्या नावाचा तक्रारअर्ज आल्याने गुन्हे शाखा परिमंडळ पाचच्या युनिटने त्याच्याविरुद्ध कारवाईची तयारी चालवली. त्याला चाैकशीसाठी युनिट कार्यालयात बोलविले. प्रतिसाद न मिळाल्यामुळे पोलीस त्याला शोधू लागले. दोन दिवसांपूर्वी तो फुटाळा तलाव परिसरात असल्याचे कळताच त्याला फोन करून पोलिसांनी चाैकशीसाठी दाखल होण्याची सूचना केली. त्यानुसार तो गुन्हे शाखा कार्यालयात आला. तेथे काय झाले कळायला मार्ग नाही. शेखूने पोलिसांवर बेदम मारहाणीचा आरोप लावला. तो एका रुग्णालयात दाखल झाला. त्याने स्वत:चे फोटो आणि व्हिडीओ आपल्या मित्रांच्या मदतीने त्याने व्हायरल केला. फोटोत त्याच्या पाठीवर पट्ट्याने मारल्याचे व्रण स्पष्टपणे दिसतात. यामुळे शनिवारी सकाळपासून हा प्रकार जाणून घेण्यासाठी पत्रकार कामी लागले. त्यातून उघड झालेल्या माहितीनंतर शेखू हा शहरातील कुख्यात गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा चुकविण्यासाठी त्याने ही गेमबाजी केल्याचेही उघड झाले. दरम्यान, शेखूने पलटवार केल्यामुळे पोलीस आता त्याची वेगळ्या पद्धतीने चाैकशी करण्याच्या तयारीला लागले आहे.
----
शेखूला हूल देणारा कोण ?
मोठ्या प्रमाणावर गंभीर गुन्हे दाखल असल्याने पोलिसांवर आरोप करण्याची हिम्मत शेखू करू शकत नाही. त्यामुळे त्याला पोलिसांवर कुरघोडी करण्याचा सल्ला कुणी दिला, असा पोलिसांना प्रश्न पडला आहे. पोलीस त्याचेही उत्तर शेखूच्या चाैकशीतून मिळवणार आहेत.
----