सुरेश भोयर, आर्य, अल्ताफ यांची माघार नागपूर : आजचा दिवस राजकारणात मोठी उलथापालथ करणारा राहीला. कामठीत काँग्रेस नेते सुरेश भोयर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांना समर्थन दिले. तर बसपाचे उमेदवार मोहम्मद अरशद मोहम्मद अलताफ यांनी अर्ज मागे घेतल्याने कामठीत बसपाचा उमेदवारच रिंगणात उरलेला नाही. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शेखर सावरबांधे यांनी पदाचा राजीनामा देत दक्षिण नागपूरच्या रिंगणात कायम राहण्याचा निर्णय घेतला. पश्चिम नागपुरात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतला. एकूण पाच उमेदवारांनी अर्ज माघार घेतले.दक्षिण नागपुरात शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेले जिल्हाप्रमुख शेखर सावरबांधे यांनी पदाचा राजीनामा देत निवडणूक रिंगणात कायम राहण्याचा निर्णय मंगळवारी जाहीर केला. त्यामुळे शिवसेनेतील बंडखोरीवर शिक्कामोर्तब झाले. जनमताचा कौल घेतल्यानंतर आपण निर्णय जाहीर करू, असे सावरबांधे यांनी स्पष्ट केले होते. मंगळवारी अखेर त्यांनी निवडणूक लढणार हे स्पष्ट केले. गेल्या तीन दिवसांपासून आपण मानसिक दबावात होतो. विविध राजकीय पक्षातील नेत्यांचा सल्ला व मतदारांचा कौल घेतला. पक्षश्रेष्ठींनी २००९ मध्ये आणि आताही विश्वासघात केला. त्यामुळे आता मतदारांवरच विश्वास ठेवून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याचे सावरबांधे यांनी स्पष्ट केले. दक्षिणमध्ये शिवसेनेने किरण पांडव यांना उमेदवारी दिली आहे, हे विशेष. दरम्यान, सायंकाळी सावरबांधे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला. शिवसेना कार्यालयात शिवसैनिकांच्या उपस्थितीत त्यांनी कार्यभार उपजिल्हाप्रमुख राधेश्याम हटवार यांच्याकडे सोपविला. आपण पदाचा राजीनामा दिला, पक्षाचा नव्हे. शिवसैनिक म्हणून पुढच्याही काळात काम करीत राहणार, असे सावरबांधे यांनी यावेळी जाहीर केले. कामठी मतदारसंघात दिवसभर राजकीय घडामोडी झाल्या. काँग्रेसने कामठीत माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेले जि.प.चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. भोयर यांनी अर्ज भरताना केलेले शक्तिप्रदर्शन बघता त्यांची उमेदवारी मुळक यांच्यासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता होती. मात्र भोयर यांनी आज माघार घेतली व मुळक यांना समर्थन जाहीर केले. शहरात पश्चिम नागपूरमधून राष्ट्रवादीचे वेदप्रकाश आर्य यांनी सुरुवातीलाच अर्ज दाखल केला होता. पण पक्षाने येथे प्रगती पाटील यांना उमेदवारी दिली त्यामुळे आर्य यांनी माघार घेतली. त्याच प्रमाणे काटोलमधून शेख इस्माईल शेख याकूब, देवीदास सदाशिव घायवट यांनी अर्ज मागे घेतला. (प्रतिनिधी)
कामठीत समेट - दक्षिणचे बंड कायम
By admin | Updated: October 1, 2014 00:45 IST