लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी राज्य शासनाने ‘लाॅकडाऊन’ची घाेषणा करीत त्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. मात्र, अत्यावश्यक सेवा व वस्तूंची दुकाने वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याच्या आदेशाला विराेध करीत कामठी शहरातील व्यापाऱ्यांनी मंगळवारी (दि. ६) सकाळी फेरूमल चाैकात शासनाच्या विराेधात निदर्शने केल्याने तिथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले हाेते. पाेलीस प्रशासनाने ऐनवेळी मध्यस्थी केल्याने तणाव निवळला. व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार अरविंद हिंगे यांच्याकडे मागण्याचे निवेदनही साेपविले.
दुसऱ्या टप्प्यातील काेराेना संक्रमण झपाट्याने वाढत आहे. मृत्यूदर वाढत असल्याने परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून राज्य शासनाने राज्यात ‘लाॅकडाऊन’ची घाेषणा करीत त्याची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. या मार्गदर्शक तत्त्वानुसार अत्यावश्यक सेवा व अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिले. शासनाने अत्यावश्यक सेवा व वस्तू काेणत्या हेही स्पष्ट केले.
या आदेशाचे पालन करण्यासाठी स्थानिक प्रशासन व पाेलिसांनी अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना केल्या. त्यातच व्यापारी मंगळवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास शहरातील फेरूमल चाैकात गाेळा व्हायला सुरुवात झाली. त्यांनी कापड, जनरल स्टोर, हार्डवेअर, फूटपाथवरील दुकाने बंद करण्यास विराेध दर्शवीत शासनाच्या या निर्णयामुळे दुकानदार व दुकानात काम करणाऱ्या नाेकरांवर उपासमारीची वेळ येणार असल्याचे सांगत विराेध करायला सुरुवात केली. शिवाय, सरसकट सर्व दुकाने बंद ठेवण्याची मागणी केली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले हाेते.
कामठी(जुनी)चे प्रभारी ठाणेदार रामदास पाटील, कामठी(नवीन)चे प्रभारी ठाणेदार मंगेश काळे, दुय्यम निरीक्षक युनूस शेख, उपनिरीक्षक नितीन मदनकर, संजय गीते यांच्यासह अन्य पाेलीस अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांची समजूत घालत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी अतिरिक्त पाेलीस कुमकही बाेलावण्यात आली हाेती. शेवटी व्यापाऱ्यांनी तहसील कार्यालय गाठत तहसीलदार अरविंद हिंगे यांना निवेदन दिले. त्यांच्या अनुपस्थितीत नायब तहसीलदार आर.टी. उके यांनी निवेदन स्वीकारले.