आॅनलाईन लोकमतगडचिरोली- आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या अंगरक्षकाने त्यांच्याच जनसंपर्क कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आज भल्या सकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास रिव्हॉल्वरमधून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. भास्कर चौके (३५) असे अंगरक्षकाचे नाव आहे.प्राथमिक माहितीनुसार, आज पहाटे भास्कर चौके हा मोटारसायकलने आ.कृष्णा गजबे यांच्या देसाईगंज येथील जनसंपर्क कार्यालयात आला. मोटारसायकल खाली ठेवून तो वरच्या मजल्यावरील जनसंपर्क कार्यालयात गेला. यावेळी कार्यालय कुलुपबंद होते. काही क्षणातच त्याने प्रवेशद्वारासमोरच स्वत:च्या कानशिलात गोळी झाडली. बंदुकीच्या गोळीचा आवाज येताच समोरील पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. त्यांनी लगेच गजबे यांनाही माहिती दिली. गजबे यांनी चौके यास ग्रामीण रु ग्णालयात दाखल केले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर त्याला गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रु ग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला.भास्कर चौके हा आ.कृष्णा गजबे यांच्या पोटगाव या गावचा रिहवासी आहे. तो आपल्या परिवारासह देसाईगंज येथे वास्तव्य करीत होता. दोन वर्षांपासून तो आ.गजबे यांचा अंगरक्षक म्हणून कार्यरत होता. कौटुंबिक कलहातून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. दुर्गम भागातील जवान तसेच लोकप्रतिनिधींचे अंगरक्षक बरेच तणावात असतात. यापूर्वी दुर्गम भागातील अंगरक्षकांनी आत्महत्या केल्याच्या घटना जिल्ह्यात घडल्या आहेत.
आ.कृष्णा गजबे यांच्या अंगरक्षकाची आत्महत्या
By admin | Updated: June 23, 2017 13:08 IST