नागपूर : गर्द पिताना आढळलेल्या एका गर्दुल्ल्यास मादक पदार्थविरोधी कायद्याचे विशेष न्यायाधीश एस.डी. जगमलानी यांच्या न्यायालयाने तीन महिने पाच दिवसांचा सश्रम कारावास आणि २०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. मोहम्मद रियाजुद्दिन मोहम्मद सिराजुद्दिन (३०), आरोपीचे नाव असून तो मोमीनपुरा येथील रहिवासी आहे. तो सायकलरिक्षाचालक आहे. शहर गुन्हे शाखेचे हेड कॉन्स्टेबल दिलीप खंडारकर हे २८ जुलै २००९ रोजी सकाळी ११.२० वाजताच्या सुमारास आपल्या सहकाऱ्यांसह पेट्रोलिंग करीत असताना त्यांना मोमीनपुऱ्यातील युनानी इस्पितळाजवळ गर्द पिताना आढळून आला होता. अंगझडतीत गर्द पिण्याची पुंगळी आणि गर्द या अतिजहाल मादक पदार्थाचे अंश असलेली ‘सिल्व्हर फॉईल’ (पन्नी) आढळून आली होती. पोलिसांनी लागलीच त्याला अटक केली होती. त्याच्याविरुद्ध तहसील पोलीस ठाण्यात मादक पदार्थविरोधी कायद्याच्या कलम २७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील लीलाधर शेंदरे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
गर्द पिणाऱ्यास कारावास
By admin | Updated: January 3, 2015 02:25 IST