लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीची कार्यकारिणी अखेर घोषित करण्यात आली आहे. अध्यक्षा नीता ठाकरे यांच्या अध्यक्षतेतील या कार्यकारिणीत १८४ पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. आगामी महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच घटकातील महिलांना यात स्थान देण्यात आले आहे.
नीता ठाकरे यांनी रविवारी कार्यकारिणीची घोषणा केली. कार्यकारिणीत मनिषा कोठे, वर्षा ठाकरे व मनिषा काशीकर या तीन महामंत्री, संपर्कमंत्री प्रीती गायधने, कोषाध्यक्ष मोना रामाणी यांच्यासह सात संपर्क प्रमुख, १३ विशेष निमंत्रित सदस्य, २० उपाध्यक्ष, २५ मंत्री, ४८ निमंत्रित सदस्य, ३४ कायम निमंत्रित सदस्य, २४ सदस्य, नोंदणी प्रमुख, कार्यालय प्रमुख, स्वागत प्रमुख यांचा समावेश आहे.
महानगरपालिका निवडणुकांच्या नियोजनावर भाजपकडून भर देण्यात येत आहे. मागील निवडणुकांत अनेक इच्छुक महिलांना तिकीट नाकारण्यात आले होते. याशिवाय विविध कारणांमुळे काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. त्यांची नाराजी या जम्बो कार्यकारिणीत स्थान देऊन दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
मुस्लिम पदाधिकाऱ्यांचादेखील समावेश
भाजपला अनेक मुस्लिमबहुल भागात बूथप्रमुख नेमण्यात अडचणी येत आहे. या भागात संघटन मजबूतीसाठी कार्यकारिणीत मुस्लिम पदाधिकाऱ्यांनादेखील स्थान देण्यात आले आहे. कार्यकारिणीत चार मुस्लिम महिलांचा समावेश आहे.