विश्वासघात : मैत्रिणीच्याच घरी मारला हात नागपूर : बहिणीसारखा मान देणाऱ्या आपल्या मैत्रिणीच्या घरातून पाच लाखांची रोकड अन् सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिलेला सोनेगाव पोलिसांनी अटक केली. कोर्टातून तिचा पीसीआरही मिळवण्यात आला आहे. संगीता राहूल गोधनकर (टेलिकॉमनगर, प्रतापनगर) असे आरोपी महिलेचे नाव आहे. सुषमा गौतम भटकर (वय ३०, रा. सोनेगाव) या मैत्रिणीकडे संगीताचे नेहमी जाणे-येणे होते. सुषमा संगीताला आपल्या बहिणीप्रमाणेच मानत होती. त्यामुळे तिच्या येण्या-जाण्यावर कोणतेच निर्बंध नव्हते. ३ जुलैला संगीता सुषमाकडे आली; तेव्हा सुषमा आपल्या कामात होती. संगीता निघून गेल्यानंतर सुषमा यांनी सायंकाळी सहजच कपाट उघडून बघितले. यावेळी त्यांना कपाटातील पाच लाखांची रोकड तसेच सोन्याचे दागिने (किंमत २ लाख ४० हजार) दिसले नाही. पतीने हे नेले असावे, असे समजून सुषमा गप्प बसली. रात्री पती घरी परतल्यानंतर सुषमाने त्यांना रोकड आणि दागिन्यांबाबत विचारणा केली. पतीने हे सर्व घरातच होते, असे सांगून घरी कोण कोण आले होते, त्याची चौकशी केली; नंतर भटकर दाम्पत्याने सुषमाला विचारपूस केली. तिने उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे भटकर दाम्पत्याचा संशय बळावला. त्यानंतर हे प्रकरण दोन्हीकडच्या संबंधित व्यक्तींच्या कानावर गेले. त्यामुळे संगीताने आपली चूक मान्य करून रक्कम परत देण्याची तयारी दर्शविली. मात्र काही तासातच तिने घूमजाव केले. स्वत:च पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला. त्यामुळे हादरलेल्या भटकर दाम्पत्याने सोनेगाव ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून चौकशी केली; नंतर संगीताला शुक्रवारी अटक केली. कोर्टातून तिचा १४ जुलैपर्यंत पीसीआर मिळवला. (प्रतिनिधी)बांगड्यांचा शोध लागलाचौकशीत संगीताने चोरलेल्या दागिन्यांपैकी सोन्याच्या बांगड्या मुथुटमध्ये गहाण ठेवल्याचे स्पष्ट झाल्याचे पोलीस सांगतात. रोकड अन् इतर दागिन्यांचे काय झाले, याची पोलीस चौकशी करीत आहेत.
दागिने चोरणारी महिला अडकली
By admin | Updated: July 14, 2014 02:57 IST