सुमेध वाघमारे
नागपूर : डोळ्यात जरासे काही गेले तर जळजळ होणे, पाणी येणे, खुपणे अशा अनेक त्रासातून जावे लागते; परंतु योग्य उपचाराअभावी सलग तीन वर्षे चंद्रपूर जिल्ह्यातील एक ४६ वर्षीय रुग्ण डोळ्यात चक्क काटा घेऊन फिरत होता. डोळ्याचे दुखणे थांबविण्यासाठी त्याच्यावर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केली. समस्या कमी होण्याऐवजी ती वाढली. अखेर नागपूर गाठले. एका ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञाने आपल्या अनुभव व कौशल्याच्या बळावर डोळ्यावर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली. खोल रुतून बसलेला काटा बाहेर काढला सोबतच, दृष्टीही वाचविली. विशेष म्हणजे, ही शस्त्रक्रिया मोफत केली.
रामपूर, ता. चिमूर, जि. चंद्रपूर येथील प्रकाश चौधरी (वय ४६) त्या रुग्णाचे नाव. प्राप्त माहितीनुसार, घरी कुठलेतरी काम करीत असताना प्रकाशच्या उजव्या डोळ्यात कचरा गेला. डोळे पाण्याने धुतल्यानंतर त्रास कमी होत नव्हता. डॉक्टरांना दाखविले; परंतु काहीच नसल्याचे सांगितले. डोळ्यात दुखणे सुरूच होते. या तीन वर्षांत विविध डॉक्टरांकडून औषधोपचार केला; परंतु यश मिळाले नाही. शेवटचा उपाय म्हणून वर्धेतील एका मोठ्या रुग्णालयात दाखविले. उजव्या डोळ्यात मोतीबिंदू झाल्याचे त्यांनी निदान करीत शस्त्रक्रिया केली. मात्र, दुखणे कायम होते. उलट अंधुक दिसण्याची समस्या वाढली. पुन्हा त्याच रुग्णालात तपासणी केली. डॉक्टरांनी ‘विट्रेक्टामी’ म्हणजे डोळ्यातील पोकळी भरून काढणारे ‘ऑइल’ काढून त्या ठिकाणी दुसरे ‘ऑइल’ टाकण्याचा शस्त्रक्रियेचा सल्ला दिला; परंतु त्याचा खर्च प्रकाशचा आवाक्याबाहेर होता.
यामुळे नागपूर गाठले. सारक्षी नेत्रालयात ‘नेत्रपटल’ची तपासणी केली. नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत बावनकुळे यांनी आजाराचे अचूक निदान केले. थ्रीडी तंत्राद्वारे डोळ्याच्या आतील रेटीनावर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केली. रेटीनाचा आत खोल रुतून बसलेला काटाही बाहेर काढला. शस्त्रक्रियेनंतर प्रकाशच्या डोळ्यातील दुखणे बंद झाले. काही दिवसांनंतर त्याला स्पष्ट दिसू लागले. ही शस्त्रक्रिया महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून निशुल्क करण्यात आल्याने मोठा दिलासाही मिळाला.
-जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी
प्रकाशच्या रेटीनावरील शस्त्रक्रिया जोखमीची होती; परंतु थ्रीडी यंत्राची मदत व अनुभवामुळे ती यशस्वी केली. सोबतच रेटीनाच्या आत रुतून बसलेला काटाही बाहेर काढण्यात यश आले. प्रकाशची दृष्टी वाचली आणि त्याचे दुखणेही बंद झाले.
-डॉ. प्रशांत बावनकुळे, ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ