नागपूर विद्यापीठ : राहुल बजाज राहणार उपस्थितनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन जानेवारी महिन्यात होण्याची दाट शक्यता आहे. या नव्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी बजाज समूहातर्फे ‘सीएसआर’अंतर्गत (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) १० कोटींचा निधी दान देण्यात येणार आहे. बजाज समूहाचे चेअरमन राहुल बजाज नागपुरात आले असता प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांनी त्यांची भेट घेतली. विद्यापीठाची नियोजित प्रशासकीय इमारत अंबाझरी मार्गावरील विद्यापीठ परिसराजवळ असलेल्या ४४ एकर मोकळ्या जागेवर उभारण्यात येणार आहे. या बांधकामासाठी पहिला हप्ता म्हणून ५० लाखांचा चेक विद्यापीठाला सुपूर्द करण्यात आला आहे. सोमवारी राहुल बजाज नागपूरला आले असता, त्यांनी प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांच्याकडून इमारतीचा निर्माणाचा आढावा घेतला. त्यांनी इमारतीचा नकाशादेखील पाहिला, तसेच इमारतीच्या भूमिपूजनासाठी जानेवारीत येण्याचे कबूल केले.‘इको’ इमारत उभारणारसंबंधित इमारत ही ‘इकोफ्रेंडली’ असावी, अशी अपेक्षा राहुल बजाज यांनी व्यक्त केली. या इमारतीचे बांधकाम याच पद्धतीने होणार असल्याची माहिती प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांनी त्यांना दिली. इमारत मार्च २०१६ पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील, असेदेखील त्यांनी सांगितले. जी.एस. महाविद्यालयात झालेल्या या चर्चेत शेखर बजाज, मधुर बजाज व प्राचार्य खंडाईत हे देखील उपस्थित होते.(प्रतिनिधी)मुहूर्त लांबणीवर का?राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नवीन प्रशासकीय इमारतीसंदर्भात प्रशासनाने तातडीची पावले उचलण्यास सुुरुवात केली होती. विद्यापीठातर्फे जुलै महिन्यातच या इमारतीचा ‘प्लॅन’ अंतिम करण्यात आला होता. या इमारतीसंदर्भात इतर प्रशासकीय मंजुरीसाठीचा कालावधी लक्षात घेतला तरी साधारणत: आॅक्टोबरपासून याचे बांधकाम सुरू होईल, असा दावा विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी केला होता. परंतु आता आॅक्टोबरचा मुहूर्त लांबणीवर का पडणार आहे, याचे ठोस उत्तर मिळू शकले नाही.
प्रशासकीय इमारतीला जानेवारीचा मुहूर्त
By admin | Updated: September 30, 2014 00:38 IST