नाट्य व्यवसायासाठी शासनाकडून अपेक्षा करणे चुकीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 10:33 AM2019-08-28T10:33:09+5:302019-08-28T10:33:31+5:30

घरी टीव्हीवर ६०० च्यावर चॅनल्स असताना लोकांना नाटक बघायला बाहेर काढण्यासाठी तुम्ही किती मेहनत घेता, यावर लक्ष देणे गरजेचे आहे. शासन यासाठी काय करणार, असे परखड मत चित्रपट व नाट्य अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केले.

It is wrong to expect support for theater business from government | नाट्य व्यवसायासाठी शासनाकडून अपेक्षा करणे चुकीचे

नाट्य व्यवसायासाठी शासनाकडून अपेक्षा करणे चुकीचे

Next
ठळक मुद्देमुलाखतीमधून दिलखुलास गप्पा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नाट्य किंवा कलाक्षेत्र हा व्यवसायाचा भाग आहे आणि व्यवसाय म्हणून त्याचे नियोजन आपल्यावर अवलंबून आहे. त्यासाठी शासनाला दोष देणे किंवा शासनाकडून अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. नाटक हे शासन व लोकांसाठी शेवटचे प्राधान्य असते. घरी टीव्हीवर ६०० च्यावर चॅनल्स असताना लोकांना नाटक बघायला बाहेर काढण्यासाठी तुम्ही किती मेहनत घेता, यावर लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी तुमचा बिझनेस मॉडेल कसा सर्वोत्तम होईल हे तुमच्यावर अवलंबून आहे, शासन यासाठी काय करणार, असे परखड मत चित्रपट व नाट्य अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केले. ज्यांच्याकडे फार काम नाही त्यांनाच असहिष्णूता सतावत असल्याची टीकाही त्यांनी केली.
एसजीआर नॉलेज फाऊंडेशन व चिटणवीस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गप्पा, गोष्टी, गाणी’ या सदरात प्रशांत दामले यांनी मुलाखतीमधून प्रेक्षकांशी दिलखुलास संवाद साधला. मृणाल नाईक यांनी त्यांची मुलाखत घेतली. वेबसिरीज किंवा मोबाईलवर वेगवेगळ्या मनोरंजनाची दुनिया उपलब्ध असताना नाटकाचे भवितव्य काय, या प्रश्नावर ते म्हणाले, आताची चाळिशीत असलेली पिढी ६५ ते ७० ची होईपर्यंत म्हणजे आणखी २०-२५ वर्षे नाटकांना धोका नाही, पुढे मात्र अमूल्य ठेवा म्हणून मराठी रंगभूमी चालेल, असे उत्तर त्यांनी दिले. वेगवेगळ्या प्रकारचे रिअ‍ॅलिटी शो करणे हा चॅनेल्सचा व्यवसाय आहे. पण अशा शोमध्ये मुलांना पाठवायचे की नाही आणि त्यात किती वाहून जायचे, हे ठरविण्याची जबाबदारी आईवडिलांची आहे. प्रसिद्धीमुळे अनेक कलावंतांमध्ये व्यसनाधिनता आणि स्वैराचार वाढतो, या प्रश्नावर ते म्हणाले की, प्रत्येक क्षेत्रात व्यसनाधिनता आहे, मात्र अशा सवयींना मर्यादित करणे आपल्यावर अवलंबून आहे व त्यासाठीही पालकांचे संस्कार महत्त्वाचे आहेत. आपल्या कामाशी इमान राखून या गोष्टी सांभाळल्या तर त्याचे दुष्परिणाम अधिक होत नाही, असेही ते म्हणाले. कामाच्या ओघात स्वत:च्या तब्येतीची काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
विनोदी नाटकाबाबत ते म्हणाले, सकाळपासून झोपेपर्यंत लोकांना अनेक प्रकारचे टेन्शन असते. अशावेळी थिएटरमध्ये येणाऱ्या अशा दर्शकांना हसविणे आवश्यक आहे. विनोद हा एकाच प्रकारचा नसतो. व्यावसायिक नाटके अशीच असावीत, ज्यांना गंभीर आवडते त्यांच्यासाठी प्रायोगिक रंगभूमी आहे, असे मत त्यांनी मांडले. माझी आवड व व्यवसाय हाच असल्याने १२ हजाराच्यावर नाटक करू शकलो, अशी कबुली त्यांनी दिली. पाककृतीच्या शोबद्दल, स्वयंपाक ही एक कलाच असून गृहिणींची भावना त्यात गुंतली असल्याची भावना दामले यांनी व्यक्त केली.

Web Title: It is wrong to expect support for theater business from government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.