विवेक घळसासी : भारत मंगलतर्फे व्याख्यान नागपूर : हल्ली सारेच स्वत:च्या दिसण्याकडे फार लक्ष देतात. चांगले दिसणे ही बाब कुणीही अमान्य करणार नाही; पण दिसणे आणि असणे यात अंतर असायला नको. सध्या आपले सारेच वर्तन प्रदर्शनीय झाले आहे. आपण जे नाही ते दाखविण्याचा प्रयत्न करतो आणि स्वत:ची अस्मिताच घालवून बसतो. आपण कसे दिसतो यापेक्षाही आपण काय आहोत, ते महत्त्वाचे मानले पाहिजे. हा विचार आपल्या संस्कारातून निर्माण होतो, असे मत ज्येष्ठ पत्रकार विवेक घळसासी यांनी व्यक्त केले. भारत मंगलतर्फे ‘व्यक्ती निर्माण आणि सामाजिक परिवर्तन’ विषयावर त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन पं. बच्छराज व्यास विद्यालय, राजाबाक्षा येथे करण्यात आले होते. याप्रसंगी गुरुजी गोळवलकर यांच्या अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला. गुरुजींनी व्यक्ती निर्माण करण्यासाठी १९२0 सालीच जे विचार मांडले ते मूलगामी आणि सार्वत्रिक आहेत. आज त्याच विचारांवर व्यवस्थापनाचे अभ्यासक्रम सुरू आहेत, पण त्यातला संस्कार मात्र हरविला. गुरुजींच्या या विचारांवरच डॉ. हेडगेवार यांनी संघ शाखांची संकल्पना मांडली. शाखांमधून व्यक्ती निर्माण आणि सामाजिक परिवर्तनाचा प्रयत्न आता यशस्वी होताना दिसतो आहे. माणसाच्या विकसनाची प्रक्रिया ही सातत्याने चालणारी आहे. मानवी दृष्टीच्या र्मयादेत हा विकास पूर्णत्वाला गेल्यावर तो माणूस महापुरुष ठरतो. पण आपल्या परंपरेत केवळ एवढाच विकास महत्त्वाचा नाही. विकासाची संपूर्णता सर्मपित होण्यात आहे. या तपश्चर्येतून आध्यात्मिक परिपक्वता येते. आपल्या आयुष्यात आपण लौकिकार्थाने यशस्वी होऊ शकतो. इतरांना फसविण्याची कला अवगत झाली म्हणजे खूप पैसा मिळविता येतो. पण हेच आपण यश समजतो. यशस्वी होणे आणि आयुष्य सार्थकी लागणे, यात अंतर आहे. सार्थक यश मिळविता आले पाहिजे. जे मिळवायचे ते पुन्हा समाजासाठी खर्च करण्याची वृत्ती असली पाहिजे. गुरुजींचे संपूर्ण जीवन या वृत्तीने गेले. त्यांचे जीवन सर्वांंंंसाठी प्रेरणादायी आहे. सध्या आपण सुशिक्षित होतो, पण सुसंस्कार हरवितो आहे. शिक्षणात आमूलाग्र बदलाची गरज निर्माण झाली आहे. शिक्षणाच्या प्रक्रियेत संस्कारांसाठी पालकांचा, शिक्षण संस्थांचा, समाजाचाही सहभाग असल्याशिवाय योग्य पद्धतीने व्यक्ती निर्माण आणि सामाजिक परिवर्तन होणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला गिरीश ठाकरे, संतोष माहूरकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
दिसण्यापेक्षा असणे महत्त्वाचे मानावे
By admin | Updated: June 6, 2014 00:59 IST