लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहर पोलीस वाहतूक शाखेने आपल्याच पोलीस विभागातील एका वाहनाचे चालान कापले. हे वाहन शहरातील एका सिग्नलवर राँग साइड उभे करण्यात आले होते. शहरातील एका जागरूक युवकाने याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. यानंतर शहर पोलिसांना जाग आली. दोन दिवसातच संबंधित वाहनाचे चालान कापण्यात आले.
नागपुरातील आशिष नावाच्या एका युवकाने १ फेब्रुवारी रोजी ट्विटरवर एक फोटो अपलोड केला होता. त्याने नागपूर वाहतूक पोलीस, नागपूर शहर पोलीस आयुक्त आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही आपले ट्विट टॅग केले होते. या युवकाचे म्हणणे होते की, फोटोमध्ये दिसत असलेले पोलीस वाहन क्रमांक एम.एच.३१ सीवाय ००७५ काटोल रोड सिग्नलजवळ राँग साइडने पार्क करण्यात आले होते. युवकाने या ट्विटच्या माध्यमातून संबंधित वाहनाविरुद्ध वाहतूक नियमानुसार आवश्यक कारवाई करण्यात यावी, असे आवाहन केले होते. नागपूर पोलिसाच्या वाहतूक विभागाने या ट्विटचे उत्तरही दिले आणि या प्रकरणात संबंधित वाहनाविरुद्ध दोन दिवसात चालानची कारवाई केली.
बॉक्स
युवकाने विभागाला मागितला कारवाई केल्याचा पुरावा
या युवकाने सोशल मीडियावर संबंधित वाहनावर कारवाई करण्याचे आवाहन केले. तेव्हा नागपूर पोलिसांकडून त्याला उत्तरही देण्यात आले. यात संबंधित प्रकरणाची चौकशी सदर वाहतूक झोन अधिकाऱ्यांना सोपवण्यात आली आहे. परंतु युवकाने पुन्हा नवीन ट्विट केले आणि संबंधित वाहनावर कारवाई केल्याचा पुरावा मागितला. तसेच यावेळी त्याने आपले ट्विट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, महाराष्ट्राचे पोलीस महानिदेशक व नागपूर पोलिसांनाही टॅग केले. वाहतूक विभागाने घाईघाईने २ दिवसात संबंधित पोलीस वाहनावर चालान कारवाई करीत बुधवारी दुपारी त्याची माहिती ट्विटरवर शेअर केली.