लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अल्प व्याजदराच्या कर्जाचे आमिष दाखवून देशभरातील ठिकठिकाणच्या नागरिकांचे लाखो रुपये हडपणाऱ्या टोळीतील एका महिलेला अजनी पोलिसांनी अटक केली. पूजा मॅडम उर्फ पूजा सिंग (वय ५३) असे या आरोपी महिलेचे नाव आहे.
पूजा हरियाणातील हिसार जिल्ह्यातील लाडवा येथील रहिवासी आहे. कमी व्याजदराचे दीर्घ मुदतीचे लाखो रुपयांचे कर्ज झटपट उपलब्ध करून देण्याची थाप मारून वेगवेगळ्या सबबी सांगत लाखो रुपये उकळणारी टोळी पूजा आणि तिचे साथीदार अनेक दिवसांपासून संचलित करीत आहे. त्यांनी देशातील विविध प्रांतात अनेकांना अशाप्रकारे लाखोंचा गंडा घातला आहे. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे आणि रेल्वेत कार्यरत असलेले देवानंद अनिल शेंडे यांना या टोळीने आठ लाखांचे कर्ज १० वर्षांकरिता केवळ ६.९ टक्क्याने उपलब्ध करून देण्याची आरोपी पूजा आणि तिच्या साथीदारांनी थाप मारली होती. आपण बजाज फायनान्स कंपनीतून बोलत असल्याचीही बतावणी पूजाचे साथीदार आरोपी विकास जैन, दीपक चव्हाण, संजीव कुमार, ओम प्रकाश (रा. जेपीनगर, हरियाणा) यांनी केली होती.
शिंदे यांना आधी कागदपत्रे मागून नंतर वेगवेगळे कारण सांगत आरोपींनी त्यांच्याकडून ९८ हजार रुपये उकळले. कर्ज उपलब्ध करून देण्याऐवजी प्रत्येकवेळी पैसे जमा करण्यास सांगणाऱ्या या टोळीचा संशय आल्यामुळे शेंडे यांनी ‘कर्ज नको, माझी रक्कम मला परत करा’ असे आरोपींना म्हटले. त्यानंतर आरोपींनी त्यांच्याशी संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेंडे यांनी अजनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. पोलिसांनी शेंडे यांनी जमा केलेली रक्कम कोणत्या खात्यात वळती झाली, ते शोधून त्यावर नमूद संपर्क क्रमांकाच्या आधारे पूजाचा पत्ता काढला. १५ ऑगस्टच्या रात्री अजनीचे ठाणेदार विनोद चाैधरी यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय शीतलकुमार गायकवाड यांच्या नेतृत्वात पोलीस पथक तिच्या हरियाणातील गावात पोहोचले आणि १६ ऑगस्टला पोलिसांनी तिला अटक केली.
---
विविध बँकांत खाती, लाखोंची रक्कम
पूजा आणि तिच्या टोळीतील साथीदार हरियाणा, दिल्ली तसेच उत्तर प्रदेशात राहतात. ही टोळी अशाप्रकारे ग्राहकांकडून उकळलेली रक्कम विविध बँक खात्यांत जमा करून नंतर ती आपसात वाटून घेत. गेल्या चार महिन्यात या टोळीने अशाप्रकारे अनेकांना गंडा घातला. त्यातून पूजाच्या वाट्याला चार लाखांची रोकड आली आहे. तिच्याकडून पोलिसांनी दोन मोबाइल, विविध बँकांचे पासबुक, एटीएम कार्ड आणि अन्य चिजवस्तू जप्त केल्या.
---
चार दिवसांचा पीसीआर
पूजाला न्यायालयात हजर करून तिचा चार दिवसांचा पीसीआर मिळविण्यात आला. तिच्याकडून अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता असून, पोलीस आता तिच्या फरार साथीदारांचा शोध घेत आहेत. परिमंडळ चारचे उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे, सहाय्यक आयुक्त डॉ. नीलेश पारवे, ठाणेदार विनोद चाैधरी, विजय तलवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक शीतलकुमार गायकवाड, हवालदार अविनाश श्रीरामे, सुरेश सायरे, सविता वर्मा आणि सायबर सेलचे नायक दीपक यांनी ही कामगिरी बजावली.
---