दोन आरोपी अटकेत : कोलकात्याची तरुणी सापडली नागपूर : इंटरनेटवर सेक्स रॅकेट चालवणारी टोळी गुन्हे शाखा पोलिसांच्या हाती लागली आहे. पोलिसांनी या टोळीतील दोन सदस्यांना अटक केली. त्यांच्या अड्ड्यावरून कोलकात्याची एक तरुणीही सापडली. जॉन ऊर्फ लॉरेंस डेविड डिसुजा (४०) विस्पा अपार्टमेंट, गिऱ्हे ले आऊट झिंगाबाई टाकळी व मो. सद्दाम मो. अब्दुल (२२) रा. आजरी-माजरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. त्यांचा साथीदार साहील ऊर्फ पापा तथा राज पलांदूरकर पळून गेला. जॉन, साहील व राज या टोळीचे सूत्रधार आहेत. सद्दाम कार चालक व मॅनेजरचे काम करतो. आरोपी अनेक दिवसांपासून इंटरनेटच्या माध्यमातून सेक्स रॅकेट चालवित होते. त्यांनी ‘नागपूर एस्कॉर्ट’नावाने एक वेबसाईटही तयार केली होती. यावर तिघांचेही मोबाईल क्रमांक दिले होते. ग्राहक इंटरनेटच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क साधायचे. विश्वासाचा ग्राहक असल्यावरच त्याला तरुणी उपलब्ध करून दिली जात होती. त्यांनी कोलकात्याच्या एका ३० वर्षीय युवतीला एक लाख रुपयांच्या करारावर १० दिवसांसाठी नागपुरात बोलावले होते. याची माहिती होताच पोलिसांच्या ‘पंटर’ने वेबसाईटच्या माध्यमातून संपर्क साधला. आरोपींनी आठ हजार रुपयात सौदा केला. जॉनने ग्राहकाला झिंगाबाई टाकळीतील विस्पा अपार्टमेंटमध्ये बोलावले. गुन्हे शाखा पोलीस पंटरसह तिथे पोहोचले. त्यांनी जॉन व सद्दामला पंटरकडून रुपये घेताना पकडले. जॉनने दोन महिन्यांपूर्वीच या ठिकाणी फ्लॅट भाड्याने घेतला होता. पोलिसांची नजर चुकवण्यासाठी ते दोन-चार महिन्यात फ्लॅट बदलवीत होते. त्यामुळे ते सापडतही नव्हते. आरापींचे नेटवर्क अनेक शहरांमध्ये पसरले आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुसऱ्या शहरातील तरुणींना आणून लाखो रुपयांची कमाई केली जाते. पीडित युवतीने पहिल्यांदा नागपुरात आल्याचे सांगितले आहे. युवतीने दिलेल्या माहितीनुसार साहील ऊर्फ पापाने एका इव्हेंट मॅनेजमंट कंपनीमध्ये काम लावून देण्याच्या बहाण्याने नागपुरात बोलावले. येथे आल्यानंतर आरोपींनी तिला मारहाण केली व देह व्यापार करण्यास सांगितले. ही कारवाई डीसीपी दीपाली मासिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक बाजीराव पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. (प्रतिनिधी)
इंटरनेटवरील सेक्स रॅकेट उघडकीस
By admin | Updated: October 8, 2015 02:34 IST