लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आठवडाभरात नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. दररोज ५०० हून अधिक रुग्ण वाढत आहेत. सहा दिवसात २,७९६ रुग्ण वाढले. मनपा प्रशासन व जिल्हा प्रशासनाने या संदर्भात कठोर भूमिका घेतली आहे. विशेषत: मंगल कार्यालयांवर प्रशासनाची करडी नजर आहे. दोन दिवसांपासून धडक कारवाई सुरू आहे. आज बुधवारीसुद्धा शहरातील तब्बल ९० लॉन व मंगल कार्यालयांची तपासणी करण्यात आली.
नागपुरात शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत. शाळेतील उपस्थिती निम्मी आहे. महाविद्यालयातील उपस्थिती २५ टक्क्यापर्यंत आहे. यासोबतच सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश आहेत. मंदिरे सुरू आहेत. प्रवेश दिला जात आहे. मात्र त्यांना गर्दी होणार नाही, याचे निर्देश देण्यात आले आहेत. आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी विवाह समारंभ व सार्वजनिक कार्यक्रमात २०० ऐवजी ५० व्यक्तींना परवानगी दिली आहे. झोन स्तरावर पथक गठित केले आहे. मनपाने मास्क न घालणाऱ्यांविरोधात कारवाई करीत तब्बल दीड कोटीची वसुली केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून वााढत असलेल्या कोरोनामुळे राज्य सरकारने प्रशासनाला कठोर पाऊल उचलण्याचे निर्देश दिलेले आहेत. सध्या लग्न समारंभ मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने प्रशासनाने लॉन व मंगल कार्यालयांवर अधिक लक्ष देत आहे. बुधवारी ९० मंगल कार्यालयांची तपासणी करण्यात आली. यात सर्वांना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले.