काटाेल : भरधाव ट्रकचे अचानक ब्रेक फेल झाल्याने अनियंत्रित झालेल्या ट्रकची दाेन दुचाकींना धडक लागली. त्यात दाेन्ही दुचाकीस्वार जखमी झाले. दरम्यान, ट्रकचालकाने हॅण्डब्रेक लावत ट्रक एका घराच्या संरक्षक भिंतीवर आदळला. सुदैवाने तिथे कुणीही नसल्याने पुढील अनर्थ टळला. ही घटना काटाेल शहरातील गळपुरा चाैकात बुधवारी (दि.२८) सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली.
वैभव मनाेज थाेटे रा. पेठबुधवार, काटाेल व संताेष लक्ष्मण माेहरिया, रा. पाॅवर हाऊस, संदेशनगर, काटाेल, अशी जखमी दुचाकीस्वारांची नावे आहेत. एमएच-४०/वाय-९२४१ क्रमांकाचा ट्रक सावरगाव येथून काटाेलमार्गे नागपूरकडे जात हाेता. दरम्यान, काटाेल शहरात प्रवेश करताच ट्रकचे ब्रेक फेल झाले व चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. अशात भरधाव ट्रकची प्रथम वैभवच्या दुचाकीला धडक लागली. त्यानंतर पुढे जाम नदी पुलाजवळील वळणावर भरधाव ट्रकने संताेषच्या दुचाकीला कट मारला. यात दाेन्ही दुचाकीस्वार जखमी झाले. अशात गळपुरा चाैकात ट्रकचालकाने हॅण्डब्रेक लावत ट्रक घराच्या संरक्षक भिंतीवर आदळून उभा केला. घटनेची माहिती मिळताच काटाेल पाेलिसांनी घटनास्थळ गाठून ट्रकचालकास ताब्यात घेत ट्रक पाेलीस ठाण्यात जमा केला. याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला आहे.