नागपूर : जगनाडे चौकातील संग्राम बार येथील खुनातून जामिनावर सुटताच कुख्यात राहुल कार्लेवार हा खंडणी मागत आहे. एका प्रकरणात त्याच्याविरुद्ध गुरुवारी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास या गुंडाने दिघोरी टेलिफोन नगर येथील विनोद अशोक बोंदरे (२७) याच्या मोबाईलवर संपर्क केला. हा मोबाईल विनोदची आई वनिता अशोक बोंदरे (४५) यांनी घेतला. मोबाईलवर दिघोरी बेलदारनगर येथे राहणारा कुख्यात गुन्हेगार राहुल कार्लेवार हा बोलत होता. त्याने या महिलेला धमकी देत म्हटले की, मला दोन लाख रुपये देण्यासाठी तुमच्या मुलाला समजावून सांगा, नाही तर मी त्याचा ‘मर्डर’ करील.कार्लेवारच्या या धमकीने भयभीत होऊन वनिता बोंदरे यांनी हुडकेश्वर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी या गुंडाविरुद्ध भादंविच्या ३८७ कलमान्वये गुन्हा दाखल केला. कार्लेवार हा ९ आणि १० जून २०१४ च्या रात्री संग्राम बारमध्ये झालेल्या सीताबर्डी येथील सुमित सुरेश तिवारी याच्या खुनाचा आरोपी आहे. २ फेब्रुवारी रोजीच त्याला सत्र न्यायालयातून सशर्त जामीन झालेला आहे. (प्रतिनिधी)
कुख्यात कार्लेवार मागतो खंडणी
By admin | Updated: February 20, 2015 02:07 IST