लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत लाखो रुपये हडपणाऱ्या त्रिकूटाविरुद्ध धंतोली पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला. मनोहर काचेला (वय ५५, रा. रिद्धीसिद्धी अपार्टमेंट शास्त्रीनगर, चंद्रपूर), जयंत मधुकर कारू (वय ६३, रा. सुरेंद्रनगर) आणि हसमुख रणछोड कारिया (वय ७०, रा. आनंदभवन, धरमपेठ), अशी आरोपींची नावे आहेत.फिर्यादी अमोल भक्तप्रल्हाद शेंडेकर (वय २९) हे हुडकेश्वर परिसरात राहतात. ते संगणक दुरुस्तीचे काम करतात. आरोपींची अमोलसोबत गेल्या वर्षी भेट झाली. मनोहर काचेला याचे सर्वत्र राजकीय घनिष्ठ संबंध असून, त्यामुळे तो कुणालाही शासकीय नोकरी लावून देऊ शकतो, अशी थाप कारू आणि कारिया यांनी मारली. तुम्हाला वन विभागात नोकरी लावून देतो, असेही आमिष दाखवले. त्यामुळे अमोल आणि त्याचा मित्र अक्षय गौरकर या दोघांनी त्यांच्याकडे त्यांची शैक्षनिक कागदपत्रे दिली. त्यानंतर या दोघांकडून आरोपींनी धंतोलीतील त्यांच्या मित्राच्या कार्यालयात ४ लाख ५० हजार रुपये घेतले. त्याबदल्यात त्यांना वन विभागात सरकारी नोकरी लावून देण्याचे आरोपींनी आश्वासन दिले. खात्री पटावी म्हणून कारू आणि कारियाने काचेला हा मोठा नेता असल्याची बतावणी करून त्याच्यासोबत फोनवर बोलणी करून दिली. १३ नोव्हेंबर २०१७ ते ३ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत हा व्यवहार झाला. तेव्हापासून आरोपींनी अमोल आणि अक्षय या दोघांना नोकरी लावून दिली नाही. त्यांनी फसवणूक केल्याची तक्रार अमोलने धंतोली पोलिसांकडे दिली. पोलिसांनी बरेच दिवस चौकशी केल्यानंतर शुक्रवारी याप्रकरणी पीएसआय यादव यांनी गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात असल्याचे त्यांनी लोकमतला आज सांगितले.आणखी आरोपी, अनेक पीडित!या प्रकरणात आरोपींची संख्या जास्त असल्याचा संशय असून, त्यांनी फसवणूक केलेल्या पीडितांची संख्याही जास्त असावी, असा अंदाज आहे. या प्रकरणाची कसून चौकशी झाल्यास नोकरीच्या नावाखाली बेरोजगारांची फसवणूक करणारे मोठे रॅकेटच बाहेर येण्याची शक्यता आहे.
नोकरी लावून देण्याचे आमिष साडेचार लाख हडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 21:05 IST
शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत लाखो रुपये हडपणाऱ्या त्रिकूटाविरुद्ध धंतोली पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला.
नोकरी लावून देण्याचे आमिष साडेचार लाख हडपले
ठळक मुद्देदोघांची तक्रार, धंतोलीत तिघांविरुद्ध गुन्हा