लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ट्रम्प टॅरिफमुळे जगातील अनेक देशांमध्ये नाराजीचा सूर असून भारताने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या चालीमुळे शरणागती पत्करावी असा काही पाश्चिमात्य देशांचा प्रयत्न आहे. याबाबत भारताने अधिकृत भूमिका मांडलेली नसली तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी नागपुरात सूचक विधान केले आहे. आत्मनिर्भरता व स्वबळावरच भारताची प्रगती शक्य आहे. स्वबळातूनच भारताची जास्त प्रगती होऊ शकते असे त्यांनी प्रतिपादन केले.
कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या डॉ.हे़डगेवार आंतरराष्ट्रीय गुरुकुलाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. परिस्थिती व देशाचे सूत्रसंचालक आपल्याला सांगत आहेत की भारताला आता आत्मनिर्भर व्हायला पाहिजे. आपल्या बळावरच आपली प्रगती होईल. सर्व प्रकारचे बळ वाढले पाहिजे. या सर्वाच्या पाठीमागे प्रत्येकाची अस्मिता असते. त्याच्या बळावरच विकास होऊ शकतो. जिथे स्वत्व असते तिथे बळ, ओज व लक्ष्मी यांचा निवास असतो. स्वत्व नसले तर बळदेखील नाहीसे होते. स्वनिर्भरता आली की बळ, ओज, लक्ष्मी आपोआपच येतात. भारताची परंपरा फार प्राचीन आहे. पाश्चात्यांच्या इतिहास गृहित धरला तरी इसवी सन एकपासून सोळाशेपर्यंत भारत सर्वांच्या अग्रेसर होता. आपण आपल्या स्वत्वावर पक्के होते. त्याचे विस्मरण सुरू झाले तेव्हापासून आपली घसरण सुरू झाली व आपण परकीय आक्रमकांचे भक्ष्य बनलो. इंग्रजांनी तर आपल्या बुद्धीलाही गुलाम करण्याची पद्धत विकसित केली. आत्मनिर्भर व्हायचे असेल तर आपले स्वत्व आपल्याला पूर्णपणे कळले पाहिजे, असे सरसंघचालक म्हणाले.
संस्कृतला राजाश्रयासोबत लोकाश्रयदेखील मिळावाभाषा ही आपला ‘स्व’भाव प्रकट करण्याचे साधन आहे. त्यातून माणसांचा जीवनव्यवहार उभा होता. जसा समाजाचा भाव असतो तशी तेथील भाषा असते. संस्कृत भाषेतून आपली परंपरा, भाव विकसित झाला. ती सर्वांना कळली पाहिजे. जर त्यातून जीवन व्यवहार झाला तर त्यातून संस्कृतचादेखील विकास होईल. शब्दांची सर्वात जास्त संपदा संस्कृतमध्ये आहे व ती अनेक भाषांची जननी झाली. देशातील सर्व भाषांचे मूळ संस्कृतमध्येच आहे. देशकाल परिस्थितीनुसार भाषेचा विकासदेखील होत असतो. संस्कृत जीवनव्यवहारात आली आणि आपल्याला बोलता आली पाहिजे. संस्कृत भाषा ही शास्त्राची भाषा आहे. त्याच्या संभाषणाचा अभ्यास झाला पाहिजे. त्यासाठी संस्कृत विद्यापीठातून पदवी घेतली पाहिजे असे नाही. संस्कृत भाषा कळत नाही, पण परंपरेने पाठांतर असलेली घरे भरपूर आहेत. घरोघरी संस्कृत पोहोचून त्यातून संभाषण होणे आवश्यक आहे. संस्कृत भाषेला राजाश्रय पाहिजे. भारतीयांचे स्वत्व जागे करण्यासाठी देशातील सर्व भाषांचा व त्या भाषेची जननी संस्कृतचा विकास व्हायला हवा. भाषेला राजाश्रयासोबत लोकाश्रयदेखील मिळायला हवा. यासाठी संस्कृत विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन सरसंघचालकांनी केले.