नागपूर : गोकुळपेठ येथील भारतीय मानक ब्युरोचे क श्रेणीचे वैज्ञानिक बिपीन वीरेंद्र जांभूळकर यांना सीबीआयच्या (केंद्रीय गुन्हे अन्वेषण) भ्रष्टाचारविरोधी शाखेने सापळा रचून १५ हजाराची लाच घेताना रंगेहात अटक केली. त्यांना मंगळवारी सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.एस. मुरकुटे यांच्या न्यायालयात हजर करून, त्यांचा १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आला. या सापळ्याची माहिती अशी, हिंगणघाट येथील उद्योजक अशफाक अली उस्मान अली यांची वर्धा येथे बाबूजी अॅक्वा नावाची कंपनी होती. या कंपनीत प्रक्रिया केलेल्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या तयार करून त्या विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या जात होत्या. या कंपनीला भारतीय मानक ब्युरोचा परवाना होता. एप्रिल २०१४ मध्ये या कंपनीच्या परवान्याची मुदत संपली होती. त्यामुळे या कंपनीचा एकूण व्यवहार बंद झाला होता. धाड घालून आकस्मिक पाहणीनागपूर : भारतीय मानक ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी या कंपनीवर धाड घालून आकस्मिक पाहणी केली होती. त्यात ही कंपनी बंद असल्याचे निदर्शनास आले होते. या कंपनीच्या गैरप्रकाराच्या संदर्भात भारतीय मानक ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी फौजदारी कारवाई करून वर्धा येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात खटला भरला होता. २० डिसेंबर २०१४ रोजी खटल्याचा निकाल लागून अशफाक अली हे निर्दोष ठरले होते. वैज्ञानिक बिपीन जांभूळकर यांनी अशफाक अली यांना आपल्या कार्यालयात बोलावून प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या निर्णयाच्याविरुद्ध सत्र न्यायालयात अपील दाखल करण्याची तसेच हे प्रकरण दिल्लीपर्यंत नेण्याची धमकी दिली होती. असे न करण्यासाठी त्यांनी अली यांना ५० हजाराच्या लाचेची मागणी केली होती. सौदेबाजी होऊन १५ हजार रुपये देण्याचे ठरले होते. सोमवारी लाचेची ही रक्कम घेताना जांभूळकर यांना अटक करण्यात आली. लाचेचा सापळा यशस्वी झाल्यानंतर लगेच आरोपीची अपसंपदा हुडकून काढण्यासाठी सीबीआय पथकाने जांभूळकर यांच्या निवासस्थानावर धाड घालून कसून झडती घेतली. आज सीबीआय अधिकाऱ्यांनी आरोपीला न्यायालयात हजर करून चार दिवसांच्या पोलीस कोठडी रिमांडची मागणी केली. न्यायालयाने दोन दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड मंजूर केला. न्यायालयात सीबीआयचे वकील ए. एच. खान यांनी सीबीआयची बाजू मांडली.(प्रतिनिधी)
भारतीय मानक ब्युरोच्या वैज्ञानिकास अटक
By admin | Updated: March 11, 2015 02:17 IST