आऊटरकडील भागातून करतात प्रवेश : आरपीएफ जवानांची ड्युटी लावण्याची गरज
नागपूर : रेल्वेगाड्यात अवैध व्हेंडरची संख्या वाढत आहे. आऊटरकडील भागात गाडीचा वेग मंदावल्यानंतर हे अवैध व्हेंडर रेल्वेगाड्यात प्रवेश करीत असून, आऊटरकडील भागात आरपीएफ जवानांची ड्युटी लावण्याची गरज आहे.
कोरोनानंतर रेल्वे बोर्डाने विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा केली. हळूहळू रेल्वेगाड्यांची संख्या वाढत आहे. वाढत असलेल्या रेल्वेगाड्यांसोबत अवैध व्हेंडरचीही संख्या वाढत आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर रेल्वेगाडी येण्यापूर्वी लोहापूल आणि मोमिनपुरा भागात गाडीचा वेग कमी होतो. त्याचा फायदा घेऊन अवैध व्हेंडर रेल्वेगाड्यात चढतात. नाश्ता, चहा, संत्री विकणारे व्हेंडर गाडीचा वेग कमी झाल्यानंतर गाडीत चढतात. परंतु आऊटरकडील भागात आरपीएफ जवान आणि लोहमार्ग पोलीस नसल्यामुळे त्यांचे फावते. याचा फायदा घेऊन ते रेल्वेगाड्यात प्रवेश करतात. रेल्वेगाडीत खाद्यपदार्थ विकण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून परवाना घ्यावा लागतो. परंतु या अवैध व्हेंडरकडे कोणताही परवाना नसताना ते रेल्वेगाडीत खाद्यपदार्थांची विक्री करतात. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाने या अवैध व्हेंडरचा बंदोबस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे.
.............
अवैध व्हेंडरचा बंदोबस्त करणार
‘कुठलाही परवाना नसताना रेल्वेगाड्यात खाद्यपदार्थ विकणे, हा रेल्वे अॅक्ट १४४ नुसार गुन्हा आहे. आरपीएफच्या जवानांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यापुढे अवैध व्हेंडर रेल्वेगाडीत चढताना दिसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.’
............